वर्षाच्या अखेरीस भारतीय रेल्वेने (Indian Railways) आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 2020 संपायला थोडाच अवधी शिल्लक असताना व्हिस्टाडोम कोच (Vistadome Coach) असलेली ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली. ही ट्रेन विशेष व्हिस्टाडोम टूरिस्ट कोचने बनविली असून तिचा वेगही खूप जास्त आहे. या ट्रेनची चाचणी पूर्ण झाली आहे. हा कोच रेल्वेमधील प्रवाशांचा प्रवास संस्मरणीय बनवेल, असे रेल्वेमंत्री गोयल यांनी म्हटले आहे. तसेच यामुळे पर्यटनाला आणखी चालना मिळेल अशी अशाही व्यक्त केली जात आहे.
रेल्वेने नव्याने डिझाइन केलेल्या व्हिस्टाडोम कोच ट्रेनची चाचणी घेतली गेली. या कोचसह ट्रेन रुळावर 180 किमी ताशी वेगाने धावण्यास सक्षम आहे. व्हिस्टाडोम कोचसह रेल्वेचा जास्तीत जास्त वेग ताशी 220 किमी इतका सांगितला जात आहे. विस्टाडोम कोच असलेल्या या ट्रेनने आता वेगाच्या बाबतीत देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे इंडियाची बरोबरी केली आहे. चाचणीदरम्यान वंदे भारतनेही ताशी 180 किमीपेक्षा अधिक वेग घेतला होता. आता पर्यटकांना प्रवासादरम्यान आजूबाजूच्या मनोहर दृश्यांची अनुभूती देण्यासाठी खास व्हिस्टाडोम कोच ट्रेनची निर्मिती केली आहे.
Ending the Year on a Great Note: Indian Railways' 🚆 successfully completed 180 kmph speed trial of new design Vistadome tourist coach
These coaches will make train journeys memorable for the passengers 🛤️ & give further boost to tourism 🚞 pic.twitter.com/3JxeVbQClg
— Piyush Goyal (@PiyushGoyal) December 29, 2020
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या कोचचा पहिला फोटो शेअर केला आहे. मार्चमध्ये आणखी आठ कोच तयार होतील. ज्यामध्ये उत्तर रेल्वे लखनऊ विभागात दोन डबे देण्यात येणार आहेत. जेणेकरून अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसीच्या प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना दाखवता येतील. (हेही वाचा: केरळ मधील Veli टुरिस्ट व्हिलेज मध्ये सुरू झाली देशातील पहिली सौर उर्जेवर चालणारी Miniature Train; पहा व्हिडिओ)
ट्रेनमध्ये मोठ्या ग्लासमधून आजूबाजूचा नयनरम्य परिसर दिसणार आहे. प्रत्येक कोचमध्ये 44 पर्यटक बसण्याची क्षमता असेल. आरामदायक प्रवासासाठी एअर स्प्रिंग सस्पेंशन, उंच काचेची विंडो आणि इलेक्ट्रॉनिक नियंत्रित काचेचे छत असेल, जेणेकरून आकाश पारदर्शकपणे दिसू शकेल. कोचच्या सर्व 44 सीट्स 180 डिग्री दिशेत फिरू शकतील. प्रत्येक सीटमध्ये चार्जिंग पॉईंट, संगीत ऐकण्यासाठी एक डिजिटल स्क्रीन आणि साउंड व Wi-Fi देखील असेल. रेल्वे कोच फॅक्टरी चेन्नईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2021 पर्यंत एकूण 10 व्हिस्टाडोम कोच तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.