प्रेम माणसाला आंधळे बनवते आणि जेव्हा ते घडते तेव्हा प्रेमात असलेले लोक जात, वय, नाती पाहत नाहीत. खरे प्रेम समजावून सांगणे कठीण असते असे म्हणतात; ते फक्त अनुभवता येते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कासगंजमधून समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीने आपल्या मुलाच्या होणाऱ्या सासूसह पलायन केले आहे. ही विचित्र घटना गावात चर्चेचा विषय बनली असून, एसपींच्या आदेशानुसार या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अहवालानुसार, ही घटना 5 जून रोजी घडली असून, पळून गेलेली व्यक्ती आणि त्याच्या मुलीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुलीनेच आपले वडील आणि भावाच्या होणाऱ्या सासूला पळून जाण्यात मदत केल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी दोन कुटुंबातील मुला-मुलीचे लग्न निश्चित करण्यात आले होते. लग्नाची तारीखही निघाली. मात्र या दरम्यान व्याही आणि विहीणबाई यांचे सुत जमले व नात्याची, समाजाची, मुलांची पर्वा न करता ते दोघे पळून गेले. याबाबत पळून गेलेल्या महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा ई-रिक्षा चालक असल्रेला मित्र शकील हा गेले 28 वर्षांपासून त्यांच्या घरी येत-जात आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या मुलीसोबत त्याच्या मुलाच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दोन्ही कुटुंबांनी या लग्नास होकार दिला व 7 जून ही लग्नाची तारीख निश्चित केली गेली. (हेही वाचा: UP Shocker: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने घेतला पत्नीचा जीव, नंतर स्वतः केली आत्महत्या)
त्यानंतर मुलीची 35 वर्षीय आई आणि मुलाचे वडील, शकील एकमेकांशी वारंवार संपर्क करू लागले. ते दोघे लग्नाच्या तयारीच्या निमित्ताने अनेक तास एकमेकांशी फोनवर बोलू लागले. या दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले व मुलांच्या लग्नाच्या आधी काही दिवस ते पळून गेले. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शकील हा दहा मुलांचा बाप आहे आणि महिलेला सहा मुले आहेत.
त्यानंतर महिलेच्या नवऱ्याने शकील आणि आपल्या पत्नीचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात जाऊन याप्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसही त्यांना शोधू न शकल्याने त्यांनी एसपीकडे जाऊन याप्रकरणी मदतीची याचना केली. एसपी अपर्णा कौशिक यांनी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले असून. पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला आहे.