Coronavirus in India: भारतात 34,884 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10,38,716 वर
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) भारताभोवतीचा विळखा अधिकाधिक तीव्र होत चालल्याचे चित्र सध्याच्या आकडेवारीवरुन पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, देशात मागील 24 तासांत 34,884 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुगण आढळले असून 671 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10,38,716 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 26,273 वर पोहोचला आहे. देशात सद्य घडीला 3,58,692 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यासोबतच आतापर्यंत एकूण 6,53,751 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात (Maharashtra) असून राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 92 हजार 589 इतकी झाली आहे. राज्यातील 1 लाख 60 हजार 357 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. Global COVID-19 Update: जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 1.37 कोटींच्या पार; पहा कोविड-19 च्या रुग्णसंख्येनुसार देशांची यादी

दरम्यान दिलासादायक गोष्ट म्हणजे, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) संशोधकांनी विकसित केलेली कोविड-19 (Covid-19) च्या लसीच्या चाचणीचे सुरुवातीच्या टप्प्यातील परिणाम सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. कोरोना विषाणूंविरुद्ध (Coronavirus) लढण्यास ही लस चांगला प्रतिसाद देत असल्याची अशी माहिती दिलासादायक माहिती टेलिग्राफने (Telegraph) दिली आहे. परंतु, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जगभरामध्ये संशोधन चालू असलेल्या 100 पेक्षा अधिक चाचण्यांपैकी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीचे परिणाम सर्वाधिक दिसून येत आहेत.