शोभन सरकार (संग्रहित संपादित प्रतिमा)

दोन दिवसांपूर्वी उन्नावच्या (Unnao) दौंडिया खेड्यात सोने असल्याचा दावा केल्याने चर्चेत आलेल्या, संत शोभन सरकार (Shobhan Sarkar) यांचे निधन झाले. त्यानंतर बाबांच्या निघालेल्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने जनसागर लोटला होता. लॉक डाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करून इतके लोक एकत्र आले याबाबत टीकाही झाली होती. आता गुरुवारी लॉक डाऊनचे नियम  मोडल्याच्या आरोपाखाली शोभन सरकार यांच्या हजारो अनुयायांवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी अनेक लोक चौबेपूर येथील त्यांच्या सुनोहरा आश्रमात संत शोभन सरकार यांना अंतिम निरोप आणि श्रद्धांजलीसाठी जमले होते.

शोभन सरकार ब्रह्मालीन झाल्यावर त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी जवळजवळ 4000 अनुयायी जमले होते. या 4000 अनुयायांवर पोलिसांनी साथीचा रोग अधिनियमांतर्गत 4 गुन्हे दाखल केले आहेत. लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन पोलिस ठाण्यातील पोलिसांनी 4200 अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बोलताना चौबेपूर पोलिस स्टेशनचे अध्यक्ष विनय तिवारी म्हणाले, 'आम्ही जमावाला आश्रमात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण आमचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. लॉक डाऊनमुळे कोणत्याही अंत्यसंस्कार कार्यक्रमाला 20 हून अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही, परंतु या घटनेमध्ये हजारो लोकांची गर्दी आश्रमात पोहोचली होती. या प्रकरणात सुमारे 4200 लोकांवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत.' (हेही वाचा: उन्नाव येथे 1000 टन सोन्याच्या खजिन्याचा दावा करणारे बाबा शोभन सरकार यांचे निधन; अंत्ययात्रेला गर्दी, Social Distancing चा उडाला फज्जा)

उन्नाव आणि आसपासच्या भागात शोभन सरकार यांचा चांगलाच प्रभाव आहे. शोभन सरकार यांनी काही वर्षांपूर्वी असा दावा केला होता की, उन्नावच्या दौंडियाखेडा गावाजवळील रेवा नरेशच्या (Rao Ram Baksh Singh) किल्ल्यात शिव चबुतऱ्याजवळ 1000 टन सोने गाडले आहे. मात्र सरकारने उत्खनन केल्यानंतर तिथे काहीच सापडले नाही. त्यावेळी या विषयावर बरेच राजकारणही झाले होते. आता बुधवारी बाबांचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या शेवटच्या दर्शनाला अफाट गर्दी जमली होती. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रश्नांनी घेरलेल्या जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने, उच्च अधिकाऱ्यांच्या आदेशावरून कानपूरच्या चौबेपूर पोलिस ठाण्यात तातडीने तीन गुन्हे दाखल केले.