Hindustan Unilever Ltd. (Photo Credits: ANI)

एकीकडे कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) जनता त्रस्त आहे, तर दुसरीकडे रोजच्या जीवनातील काही गोष्टी महाग झाल्या आहेत. देशातील आघाडीची FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने त्यांच्या लोकप्रिय रिन्स आणि लाइफबॉय साबणासह अनेक उत्पादनांच्या किमती 20 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. एचयुएलने ही वाढ आपल्या RIN, Surf Excel, Lifebuoy, PEARS सारख्या लोकप्रिय उत्पादनांवर केली आहे. वृत्तानुसार, कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे कंपनीने किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही HUL ने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. FMCG कंपन्यांच्या वितरकांच्या म्हणण्यानुसार, HUL नंतर, इतर मोठ्या कंपन्या देखील त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत, कारण कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचा फटका सर्वांनाच बसत आहे.

अशा वाढल्या किंमती –

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, सर्फ एक्सेल बारसाठी सर्वाधिक किंमत वाढवण्यात आली आहे, ज्याच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्फ एक्सेल बारची किंमत आता 10 रुपयांवरून 12 रुपये झाली आहे. 125 ग्रॅम लाइफबॉय साबणाची किंमत आता 29 रुपयांवरून 31 रुपये झाली आहे. 125 ग्रॅम पिअर्स साबणाची किंमत 76 रुपयांवरून 83 रुपयांपर्यंत वाढली आहे. (हेही वाचा: श्रीलंकेत महागाईचा भडका, टॉमेटो 200 रुपये किलो तर मिर्चीचे दर 700 च्या पार)

रिन साबणाच्या 250 ग्रॅम साबण पॅकची किंमतही 72 रुपयांवरून 76 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर 250 ग्रॅमच्या सिंगल बारच्या किमतीत एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. व्हील डिटर्जंट पावडरच्या अर्धा किलो आणि एक किलोच्या पाकिटाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. व्हील डिटर्जंट पावडरच्या अर्ध्या किलोच्या पॅकची किंमत आता 31 रुपये आणि एक किलोची किंमत 62 रुपये आहे.