Jammu and Kashmir. (Photo Credits: IANS|File)

जम्मू-काश्मीर (Jammu And Kashmir) मध्ये आज, शनिवारी सुरक्षा कर्मचार्‍यांवर मोठा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला. शनिवारी बारामुला जिल्ह्यातील सोपोर (Sopore) येथे झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले आहेत आणि 2 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी सोपोरमध्ये सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर हल्ला केला आहे. भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लष्करी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी एक दिवस अगोदर शुक्रवारी काश्मीरला भेट दिली होती. शहीद झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्रातील 38 वर्षीय सीबी भाकरे (CB Bhakare) यांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार दहशतवाद्यांनी अहद बाब चौकाजवळील नूरबाग भागात हा हल्ला केला. जखमी सैनिकांना तातडीने जवळच्या एसडीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सीआरपीएफच्या दोन जवानांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर काही वेळात दुसर्‍या जखमी जवानाचाही मृत्यू झाला. या हल्ल्यात काही पॅरामिलिट्री जवान जखमी झाल्याची माहिती आहे. सोपोरच्या एसपीच्या माहितीनुसार, घटनेनंतर लवकरच सुरक्षा दलाने परिसर घेरला आणि हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न चालू आहे.

सोपोर दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीपीआरएफच्या जवानांची नावे -

  1. बिहारमधील वैशाली येथील, 42 वर्षीय राजीव शर्मा
  2. महाराष्ट्रातील बुलढाण येथील, 38 वर्षीय सीबी भाकरे
  3. गुजरातमधील साबरकांठा येथील, 28 वर्षीय परमार सत्यपाल सिंह

शुक्रवारी नियंत्रण रेषेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लष्कर प्रमुख नरवणे सैन्याची तयारी पाहून समाधानी होते. स्थानिक कमांडर यांनी नरवणे यांना सद्य सुरक्षा परिस्थिती आणि दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी योजलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. दुसरीकडे पाकिस्तानकडूनही सीमेपलिकडुन होणाऱ्या संघर्षबंदीचे सतत उल्लंघन केले जात आहे. (हेही वाचा: पंजाबचे एसीपी Anil Kohli यांचे कोरोना व्हायरसमुळे लुधियाना येथे निधन; उपचारासाठी सरकारने मंजूर केली होती प्लाझ्मा थेरपी)

शुक्रवारीही सीआरपीएफच्या पथकावर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यात एक जवान जखमी झाला. याखेरीज शुक्रवारी सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमकी झाली, यात सैनिकांनी चार अतिरेकी ठार केले.