पंजाब (Punjab) राज्यातील लुधियाना (Ludhiana) जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा कोरोना विषाणूविरूद्ध लढताना मृत्यू झाला आहे. नॉर्थ लुधियानाचे सहायक पोलिस आयुक्त अनिल कोहली (ACP Anil Kohli), हे 13 एप्रिल रोजी कोरोना विषाणू पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. शनिवारी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंजाबमध्ये कोरोना विषाणूमुळे झालेला हा सोळावा मृत्यू आहे. कोहली यांच्यावर प्लाझा उपचारपद्धती अवलंबली जाणार होती, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, 8 एप्रिल रोजी तब्येत बिघडल्यामुळे एसीपी कोहली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व 13 एप्रिल रोजी त्यांची कोरोना विषाणू टेस्ट पॉझिटिव्ह आढळली.
Sad News
ACP Anil Kohli passed away.
Died of #COVIDー19 . Was admitted in SPS Hospital Ludhiana
— DPRO LUDHIANA (@LudhianaDpro) April 18, 2020
लुधियाना जिल्ह्यातील जनसंपर्क कार्यालयानेही या गोष्टीची पुष्टी केली आहे. कोहली यांना येथील एसपीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्लाझ्मा उपचार पद्धतीसाठी डोनरही मिळाला होता मात्र ही ट्रिटमेंट होण्याआधीच कोहलींची प्राणज्योत मालवली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोहलींच्या संपर्कात आलेले इतर काही लोकही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. लॉकडाऊन दरम्यान एसीपी भाजी मार्केटमध्ये ड्यूटी करत होते आणि त्याच्याबरोबर एकूण एक अधिकारीही होते. नंतर जेव्हा या दोघांचीही टेस्ट झाली तेव्हा ती सकारात्मक आली. (हेही वाचा: Coronavirus: महाराष्ट्रात येत्या 20 एप्रिल पासून नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी 'या' गोष्टी सुरु करणार, सरकारचा निर्णय)
पंजाब महसूल विभागाचे अधिकारी गुरमेल सिंह यांनाही गुरुवारी कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आणि शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पंजाबमध्ये कोरोना संसर्गाची 202 प्रकरणे समोर आली असून त्यापैकी 15 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 27 लोक बरे झाले आहेत आणि घरी गेले आहेत. पंजाब, मोहाली, एसबीएस नगर, जलंधर आणि पठाणकोट या चार जिल्ह्यांना केंद्र सरकारने हॉटस्पॉट घोषित केले आहे. आता, पंजाब सरकारने सुमारे 2.85 लाख शेतकर्यांना रब्बी पिकाची काढणी व पिके (गहू) खरेदी लक्षात घेता कर्फ्यू पास जारी केले आहेत, जेणेकरून त्यांना मंडईमध्ये धान्य सहजपणे विकता येईल.