RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात गुन्हा दाखल; पाहा काय आहे प्रकरण
RSS Chief Mohan Bhagwat | (Photo Credits: ANI)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेस (Congress) पक्षाचे ज्येष्ठ नेते हनुमंत राव (Hanumantha Rao) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हैदराबाद (Hyderabad) शहरातील एलबी नगर ( LB Nagar) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देशातील सर्व 130 कोटी भारतीय हिंदू (Hindu) असल्याचे विधान एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी केले होते. या विधानामुळे देशातील असंख्य नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत काँग्रेस नेते हनुमंत राव यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. 25 डिसेंबर या दिवशी एका आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी धर्म आणि संकृती याकडे ध्यान देत जे लोग राष्ट्रवादी भावना ठेवतात आणि भारताच्या सांस्कृतीक वारशाचा सन्मान करतात ते हिंदू आहेत. तसेच, आरएसएस (RSS) देशातील 130 कोटी लोकांना हिंदू मानतो, असेही मोहन भागवत यांनी म्हटले होते.

हनुमंत राव हे माजी राज्यसभा खासदार आहेत. राव यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, 'भागवत यांच्या विधानामुळे केवळ मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, पारशी यांच्या भावनेला इजा पोहोचवली आहे. इतकेच नव्हे तर भारतीय संविधानाच्या मूळ भावनेलाही भागवत यांनी धक्का पोहोचवला आहे. भागवत यांच्या विधानामुळे जनतेमध्ये जातीय तणाव वाढू शकतो. तसेच, हैदराबाद शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते', असाही दावा हनुमंत राव यांनी केला आहे.

एलबी नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, पोलिसांकडे काँग्रेस नेत्याकडून तक्रार आली आहे. या तक्रारीची दखल घेत घटनेची पडताळणी सुरु असून, हे प्रकरण किती दखलपात्र आहे याबाबाबत कायदेशीर विचार केला जात आहे. (हेही वाचा, गोळवलकर गुरुजींचे कालबाह्य विचार संघाने सोडले: मोहन भागवत)

दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) प्रमुख केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाबाबत असहमती दर्शवली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार भागवत यांच्या विधानाचा विरोध करताना आठवले यांनी म्हटले आहे की, असे म्हणने योग्य नाही की देशातील सर्व भारतीय हिंदू आहेत. एक वेळ होती आम्ही देशातील सर्व नागरिक बौद्ध होतो. जर भागवत यांच्या विधानाचा अर्थ भारतीय भारतीय असा आहे तर, आपल्या देशात बौद्ध, शिख, हिंदू, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि लिंगायत आदी धर्म आणि पंथांचे लोकही राहतात.