दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये (Bihar) पुन्हा एकदा बनावट दारू (Spurious Liquor) प्रकरण समोर आले आहे. माध्यमांच्या अहवालानुसार राज्यात विषारी दारूमुळे 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील गोपालगंजमध्ये मंगळवारी संध्याकाळपासून विषारी दारूच्या घटनेतील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत या विषारी मद्यपानामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर गोपालगंजच्या सदर हॉस्पिटल आणि मोतिहारीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून, अनेकांची दृष्टी गेली असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याचवेळी, बुधवार ते गुरुवार दुपारपर्यंत बेतियामध्ये (Bettiah) मृतांची संख्या दहावर गेली आहे. मृत्यू झालेले सर्वजण दक्षिण तेल्हुआ पंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोन, तीन आणि चारमधील रहिवासी आहेत. ही संख्या आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. गोपालगंज जिल्हा प्रशासनाने सात मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे, तर इतर चार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर उर्वरित मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच डीएम डॉ.नवल किशोर चौधरी, एसपी आनंद कुमार यांच्यासह उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे पथक परिसरात तपास करत आहेत.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हे मृत्यू कशामुळे झाले हे स्पष्ट होईल. सध्या पोलिसांकडून दारूच्या दुकानांवर सातत्याने छापे टाकले जात आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत तीन घरे सील करण्यात आली आहेत, तर तुर्हा टोला येथील छोटेलाल साह, अशोक शर्मा, रामप्रवेश साह आणि जितेंद्र प्रसाद या चार व्यावसायिकांना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा: Delhi Air Quality: दिल्ली शहरात मोठ्या प्रमाणावर वायुप्रदुषण, हवेची गुणवत्ता खालावली)
गोपालगंज जिल्ह्यातील महमदपूर पोलीस ठाण्याच्या कुशाहर तुर्हा टोला आणि दलित बस्तीमध्ये मंगळवारी संध्याकाळी दोन डझनहून अधिक दारू प्यायली. दारू पिल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. पोटात जळजळ आणि तोंडातून फेस येत असल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना स्थानिक रुग्णालय आणि सदर रुग्णालयात दाखल केले. बुधवारी सायंकाळपर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी हा आकडा 17 वर पोहोचला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार हा मृत्यू विषारी दारूमुळे झाला आहे.