Jaisalmer: धक्कादायक! विधवा महिलेचा पुनर्विवाहास नकार; संतापलेल्या सासरच्या मंडळींनी कापले नाक व जीभ
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना पाहता कधी कधी विश्वासच बसत नाही की, आपण 21 व्या शतकात जगत आहोत. राजस्थानच्या जैसलमेरमधील  (Jaisalmer) ही घटना आपल्या मनामध्येही संताप आणि अनेक प्रश्न उभा करेल. या ठिकाणी विधवा (Widow) महिलेसोबतच्या क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात, एका विधवा महिलेने पुन्हा लग्न करण्यास नकार दिल्याने तिच्या सासरच्या मंडळींनी तिचे नाक आणि जीभ कापली आहे. सध्या अतंत्य गंभीर अवस्थेतील या महिलेवर जोधपूर येथे उपचार सुरू आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली.

अन्य नामित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने साक्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ‘जगीरों की ढाणी’ची आहे. येथे एका विधवेवर तिच्या सासरचे लोक दुसर्‍या पुरुषाशी पुनर्विवाह करण्यासाठी दबाव टाकत होते. मात्र ही महिला यासाठी सहमत नव्हती. असा आरोप केला जात आहे की, यामुळे संतापलेल्या सासरच्यांनी महिलेचे नाक आणि जीभ कापली. महिलेला अतिशय गंभीर अवस्थेत जोधपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी जानू खान याला पोलिसांनी अटक केली. अन्य नामित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्या संभाव्य जागांवर पोलिस छापा टाकत आहेत, परंतु अद्याप त्यांना काही माहिती मिळू शकली नाही. पीडितेचा भाऊ जगीरों की ढाणी येथील रहिवासी बसीर खान यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, त्याच्या बहिणीचे लग्न 6 वर्षांपूर्वी जगीरों की ढाणी येथे राहणाऱ्या कोजे खान यांच्याशी झाले होते. लग्नाच्या एक वर्षानंतर कोजे खान यांचे निधन झाले. तेव्हापासून सासरची मंडळी पिडीतेवर दुसऱ्या लग्नासाठी दबाव टाकत आहेत. आता मंगळवारी साधारण दुपारी 1 वाजता या सासरच्या मंडळींनी पिडीतेवर हल्ला करून धारधार शस्त्राने तिची जीभ व नाक कापले.

जखमी अवस्थेत या महिलेला प्रथम सांकड़ा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर तिला जोधपूरला घेऊन जाण्यास सांगितले.