
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) महोबा (Mahoba) येथील जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी मुलाच्या उपचारासाठी रुग्णालयात पोहोचलेल्या आईकडून आरोग्य कर्मचाऱ्यांनी आधी लाच घेतली. त्यानंतर मुलाला रक्ताऐवजी चक्क ग्लुकोजमध्ये मिसळलेले लाल औषध दिले. या आईने मुलाला रक्त चढवण्यासाठी आपले दागिने विकून लाच दिली होती. रक्ताची व्यवस्था करण्याच्या नावाखाली महिला आरोग्य कर्मचाऱ्याने 5 हजार रुपये उकळले. त्यानंतर मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला दुसरे रुग्णालय रेफर केले गेले.
आता हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर सीएमएसने चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण महोबा सदर तालुक्यातील भंडारा गावचे आहे. जिथे 65 वर्षीय विधवा महिला आपला मुलगा जुगलसोबत भाड्याच्या घरात राहते. आजपर्यंत या वृद्ध महिलेला शासकीय सुविधांच्या नावाखाली कोणतीही मदत मिळालेली नाही. प्रथमच मुलाची प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पोहोचल्यावर, तिथे कर्मचाऱ्याने रक्ताच्या बाटलीच्या नावाखाली 5 हजार रुपयांची लाच मागितली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी या असहाय्य मातेला आपले दागिने विकावे लागले.
कसेबसे 5 हजार रुपये उभे करून तिने ते आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. मात्र त्यानंतर रक्ताच्या ऐवजी मुलाला चक्क लाल रंगाच्या औषधामध्ये ग्लुकोज चढवण्यात आले. यामुळे मुलाच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही उलटे त्याची प्रकृती खालावत गेली. पुढे त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर तिथे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सीएमएस डॉ आरपी मिश्रा म्हणाले की, प्रकरणाच्या चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. यासोबतच आरोपी महिला कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. (हेही वाचा: सासूने स्वयंपाक करायला सांगितल्याने संतापलेल्या सुनेने खाल्लं उंदराचं औषध; महिलेची प्रकृती चिंताजनक)
पीडित वृद्ध महिलेने स्थानिक मीडियाला सांगितले की, तिच्या मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या बदल्यात तिच्याकडून 200 रुपये घेतले गेले. याशिवाय दररोज इंजेक्शन देण्याच्या नावाखाली 100-100 रुपये घेतले जात होते. पीडितेने पुढे सांगितले की, तिच्या मुलावर उपचार करण्यासाठी तिच्याकडे एक पैसाही नव्हता. अशा परिस्थितीत रुग्णालयात मोफत उपचाराची तिची अपेक्षा होती मात्र इथे चाललेली लुट पाहून तिला धक्काच बसला.