आसामच्या (Assam) तिनसुकियामध्ये शनिवारी हॉटेल मिराना येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान अचानक एक पॉर्न क्लिप (Porn Video) स्क्रीनवर सुरु झाल्याने मोठी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली. यावेळी केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली (Rameswar Teli) आणि आसामचे कामगार मंत्री संचय किसन हे देखील उपस्थित होते. शेकडो लोकांसमोर पडद्यावर ही पॉर्न फिल्म सुरू झाल्याने घटनेनंतर तेथे अचानक एकच खळबळ उडाली. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. इंडियन ऑइलचा तिनसुकिया येथे मिथेनॉल-मिश्रित M-15 पेट्रोलचा प्रायोगिक रोलआउट लॉन्च कार्यक्रम होता.
यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके सारस्वत, इंडियन ऑइलचे अध्यक्ष एसएम विद्या, राज्याचे कामगार मंत्री संजय किशन, आसाम पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एपीएल) चे अध्यक्ष बिकुल डेका आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लॉन्चनंतर शहरातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. यावेळी मंचावर मोठा स्क्रीन लावण्यात आली होती. इंडियन ऑईलचे एक अधिकारी मंचावर आपले भाषण देत होते.
यावेळी स्क्रीनवर मिथेनॉल मिश्रित पेट्रोल प्रकल्पाची व्हिडिओ क्लिप दाखवली जात होती. प्रोजेक्टर ऑपरेटर व्हिडिओ क्लिप बदलत असताना अचानक प्रोजेक्टरच्या स्क्रीनवर एक अश्लील फिल्म दिसू लागली, जी पाहून सर्वजण थक्क झाले. व्हिडिओ 3-4 सेकंद चालला त्यानंतर ऑपरेटरने घाईघाईने तो बंद केला. मात्र, त्यापूर्वीच घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या फोनमध्ये कैद केला.
या घटनेबाबत बोलताना तेली म्हणाले, त्यावेळी मी इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्याचे भाषण ऐकत होतो. मी स्क्रीनकडे पाहत नव्हतो आणि मला ते माहित नव्हते. नंतर, माझे पीए (वैयक्तिक सहाय्यक) माझ्याकडे आले आणि त्यांनी घडलेली घटना सांगितली. डीसीही तिथे बसले होते. मी त्यांना तत्काळ तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. असा प्रकार घडला असल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. गुन्हे शाखेने या घटनेचा तपास सुरू केला आहे. प्रोजेक्टर ऑपरेटरला गुन्हे शाखेने यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा: संसदेत महत्त्वाच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान मोबाईलमध्ये Porn Video पाहताना आढळले खासदार; चौकशी सुरु)
दरम्यान, आरोपींनी झूम मीटिंगमधून पॉर्न क्लिप चालवण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली असली तरी, अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. तिनसुकिया पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.