ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समधून (UK Parliament) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी सभागृह सुरू होते, अनेक खासदार उपस्थित होते. यामध्ये काही महिला खासदारही होत्या. सभागृहात देशाच्या गंभीर प्रश्नांवर चर्चा चालू होती. यावेळी एक खासदार पुढच्या सीटवर बसून पॉर्न व्हिडिओ (Porn Video) पाहण्यात मग्न होते. महत्वाचे म्हणजे एका महिला खासदाराच्या शेजारी बसून हे महाशय अडल्ट व्हिडीओ पाहत होते. हा आरोप त्याच महिला खासदाराने केला आहे, ज्यांच्या शेजारी बसून खासदार पॉर्न व्हिडिओ पाहत होते.
मिररच्या वृत्तानुसार, एका महिला खासदाराने कंझर्व्हेटिव्ह आणि युनियनिस्ट पक्षाच्या (Conservative and Unionist Party), ज्याला टोरीज किंवा टोरी पार्टी असेही म्हणतात, खासदारावर हा आरोप करणारा अहवाल लिहिला आहे. डेलीमेलमधील वृत्तानुसार, कंझर्व्हेटिव्ह पक्षाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र, हे खासदार कोण आहेत, त्यांची ओळख उघड करण्यात आलेली नाही.
अहवालानुसार ते टोरी खासदार असल्याचे सांगण्यात आले आहे. टोरी पक्षातून 1834 मध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाची स्थापना झाली. अशा स्थितीत टोरी पक्षाला ब्रिटनमध्ये अजूनही कंझर्व्हेटिव्ह पक्ष म्हणूनही ओळखले जाते. यापूर्वीही या खासदाराने असे कृत्य केले असल्याचा दावा करण्यात आला आहे. एकदा त्यांच्या चेंबरमध्ये असताना ते पॉर्न व्हिडिओ पाहत होते आणि दुसऱ्यांदा ते कॉमन्स समितीच्या सुनावणीला उपस्थित होते तेव्हा त्यांने असे केले होते. आताची ही लाजिरवाणी घटना मंगळवारी समोर आली आहे. (हेही वाचा: आता कॉलेजमध्ये मिळणार Sex बाबतचे धडे; 'सेक्स क्लास' मध्ये विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र पाहणार पॉर्न फिल्म्स)
या प्रकरणी कंझर्व्हेटिव्ह व्हीप ऑफिसचे स्टेटमेंटही समोर आले आहे, ज्यात म्हटले आहे- 'चीफ व्हिप (ख्रिस हीटन हॅरिस) या प्रकरणाची चौकशी करत आहेत. असे वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही, याप्रकरणी कारवाई केली जाईल. त्याचवेळी उत्तर आयर्लंडचे मंत्री कोनोर बर्न्स यांनी या वर्तनाला चुकीचे म्हटले आहे. याआधी संसदेच्या स्वतंत्र तक्रारी योजनेत अहवाल दिल्यानंतर तीन कॅबिनेट मंत्र्यांसह 56 खासदारांवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप झाला होता. त्यानंतर आता हे वादळ उठले आहे.