धक्कादायक! पतीने सुरतला घेऊन जाण्यास नकार दिल्याने विवाहितेची कुंकू खाऊन आत्महत्या; Uttar Pradesh मधील घटना 
Sindoor (Representational Image) Photo credits: Wikipedia

सध्या आत्महत्येच्या (Suicides) अनेक घटना कानावर पडत आहेत. लॉकडाऊनमध्ये तर यामध्ये वाढ झालेली दिसून आली. यातील काही आत्महत्यांच्या मागील कारण पाहिले तर नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आताही उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) भदोही (Bhadohi) जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर येत आहे. भदोही जिल्ह्यात नवऱ्याने सोबत घेऊन जाण्यास नकार दिल्याने एका विवाहितेने चक्क भांगात लावायचा कुंकू (Sindoor) खाऊन आत्महत्या केली आहे. या विवाहितेचा पती सुरत येथे काम करत होता, त्याने पत्नीला सुरतला घेऊन जाण्यास नकार दिल्याने पत्नीने आपले जीवन संपवले आहे.

पोलिस सूत्रांनी बुधवारी सांगितले की, जिल्ह्यातील सुरयावां पोलिस स्टेशन परिसरातील दानपूर पश्चिम पट्टी गावात राहणाऱ्या विकास बिंदचा विवाह, तीन वर्षांपूर्वी गोपीगंज भागातील सरस्वती देवी (वय 26) हिच्याशी झाला होता. विकास गुजरातच्या सुरत जिल्ह्यात काम करतो आणि सध्या लॉकडाऊन दरम्यान तो घरी आला होता. त्यानंतर नुकतेच विकास सुरतला परतला आहे. सरस्वतीला विकाससोबत जायचे होते, मात्र आपल्या अडीच वर्षाच्या मुलाच्या काळजीपोटी त्याने सरस्वतीला सोबत नेले नाही.

विकास सुरतला परतल्यानंतर दुःखी तसेच चिडलेल्या सरस्वतीने घरात ठेवलेला कुंकू खाल्ला. त्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच बुधवारी तिचा मृत्यू झाला. सरस्वतीने नक्की किती कुंकू खाल्ला याबाबत माहिती मिळू शकली नाही. कुंकूमध्ये लीड किंवा पारा संयुगे असतात आणि ते विषारी असू शकतात. पोलिसांनी सरस्वतीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे व पुढील तपास सुरु असल्याची माहिती मिळत आहे. (हेही वाचा: 2019 मध्ये भारतात दररोज 381 लोकांनी केली आत्महत्या; संपूर्ण वर्षभरात 1.39 लाख लोकांचा मृत्यू, महाराष्ट्र अव्वल- NCRB)

दरम्यान, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) अहवालानुसार, गेल्या वर्षी देशात दररोज सरासरी 381 लोकांनी आत्महत्या केली आहे. वर्षभरात आत्महत्येमुळे जवळपास 1,39,123 जण मृत्यूमुखी पडले. आकडेवारीनुसार 2017 आणि 2018 च्या तुलनेत मागील वर्षी आत्महत्याच्या घटनांमध्ये 4.4% वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे विविध कारणांमुळे होणाऱ्या आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.