गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात ऑनलाइन जुगाराच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. अहमदाबादच्या चांदखेडा येथील विश्वकर्मा शासकीय महाविद्यालयातील 21 वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी संध्याकाळी वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. ऑनलाइन जुगार खेळताना हा मुलगा कर्जबाजारी झाला होता, त्याच नैराश्येतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. प्रभात शर्मा असे या तरुणाचे नाव असून तो गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वापी येथील दीपमाला अपार्टमेंटमधील रहिवासी आहे.
प्रभात कॉलेजमध्ये त्याच्या बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग कोर्सच्या सेमिस्टर 2 मध्ये होता. या संदर्भात चांदखेडा पोलिसांनी सांगितले की, रविवारी तो दिवसभर वसतिगृहाच्या खोलीतच होता. दुपारी त्याचे वसतिगृहातील मित्र बाहेर गेले असता त्याने आत्महत्या केली. प्रभातने त्याच्या खोलीत एक सुसाईड नोट देखील ठेवली होती, ज्यामध्ये त्याने त्याच्या कृत्याचे स्पष्टीकरण दिले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, तपासादरम्यान पोलिसांना आढळले की, प्रभात हा गुणवंत विद्यार्थी होता. त्याने 10वी, 12वी तसेच त्याच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रातही उच्च गुण मिळवले होते. परंतु ऑनलाइन गेमच्या व्यसनाने त्याचा जीव घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभातने वर्षभरापूर्वी ऑनलाइन गेम खेळण्यास सुरुवात केली होती आणि हळूहळू त्याने ऑनलाइन जुगारही खेळण्यास सुरुवात केली. यामध्ये तो खूप वेगाने पैसे गमावू लागला. ऑनलाइन गेमचा जुगार खेळण्यासाठी त्याने अनेकांकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली. मात्र कालांतराने तो हे सर्व पैसे हरला. (हेही वाचा: Lift Collapse Incident in Ahemdabad: गुजरातच्या अहमदाबाद मध्ये लिफ्ट कोसळून 7 मजूर ठार)
27 ऑगस्ट रोजी तो वापी येथील त्याच्या घरी आला असता त्याने त्याच्या आईला सांगितले की, त्याला ऑनलाइन जुगार खेळण्याच्या सवयीमुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करता येत नाही. या दरम्यान तो प्रचंड नैराश्येत होता. वापीहून परतल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांसह इतर अनेकांचा नंबर ब्लॉक केले.
पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, प्रभात शर्माच्या सुसाईड नोटमध्ये त्याने ज्या कोणाकडून पैसे उधार घेतले आहे त्या सर्वांचा उल्लेख केला आहे. त्याने आपल्यानंतर वडिलांना हे कर्ज फेडण्याची विनंती केली आहे. आपल्या वडिलांना उद्देशून सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘बाबा, जर कोणी येऊन पैसे मागितले तर कृपया पैसे द्या.’