बिहारमधील (Bihar) रोहतास जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी 60 फूट लांब आणि 20 टन वजनाचा लोखंडी पूल (Bridge) चोरून काही चोरटे पसार झाले आहेत. चोरट्यांनी दिवसाढवळ्या ही चोरी केली आहे. चोर पाटबंधारे विभागाचे अधिकारी म्हणून घटनास्थळी दाखल झाले व त्यानंतर कालव्यावरील जुना लोखंडी पूल तोडण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी गॅस कटरने पुल कापून तो जेसीबीच्या सहाय्याने गाडीवर चढवला आणि आरामात निघून गेले. नंतर हे लोक पाटबंधारे विभागाचा अधिकारी नसून चोर असल्याचे निष्पन्न झाले.
सत्य समोर आल्यानंतर ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला, तर दुसरीकडे पूल चोरीच्या घटनेने स्थानिक प्रशासनातही खळबळ उडाली. हा पूल वापरात नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, पूल चोरीची ही घटना रोहतास जिल्ह्यातील नसरीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील अमियावरची आहे. येथील आरा कालव्यावर 1972 च्या सुमारास बांधलेला लोखंडी पूल चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेला. विभागीय अधिकारी म्हणून काही लोक जेसीबी, पिकअप व्हॅन, गॅस कटर आदी घेऊन आले आणि तीन दिवसांत संपूर्ण पूल गायब करून कापून काढला.
विशेष म्हणजे या कामात चोरट्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून स्थानिक विभागीय कर्मचाऱ्यांची मदत घेत त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण पूलच चोरून नेला. तब्बल 3 दिवस हा पूल कापण्याचे काम चालू होते परंतु स्थानिक कर्मचाऱ्यांना किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना या चोरांची माहिती मिळू शकली नाही. हे लोक पाटबंधारे विभागाचे अधिकारी असून ते खराब झालेला पूल काढत असल्याचे समजल्याने गावकरीही काही बोलले नाहीत. (हेही वाचा: चीन पुरस्कृत हॅकर्सकडून लद्दाख परिसरातील वीज केंद्रे लक्ष्य- रिपोर्ट)
हा लोखंडी पूल जीर्ण झाल्याने लोक त्याचा वापर करत नव्हते. हा पूल हटवण्यासाठी ग्रामस्थांनी अर्जही केले होते. हा लोखंडी पूल सुमारे 60 फूट लांब आणि 12 फूट उंच होता. विभागीय अधिकाऱ्यांनी पूल चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.