राजधानी दिल्लीच्या सातही जिल्ह्यात जमावबंदी;  मेट्रो, बससेवाही बंद, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मोठा निर्णय
Delhi CM Arvind Kejriwal (Photo Credits: ANI)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी जवळजवळ सर्व राज्ये आपल्या परीने उपाययोजना करीत आहेत. यात सध्या लॉकडाउनचा (Lockdown) मार्ग अवलंबला जात आहे. जनता कर्फ्यू दरम्यान 31 मार्चपर्यंत दिल्ली मेट्रो (Delhi Metro) सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आता राजधानी दिल्ली लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या सकाळी 6 वाजल्यापासून दिल्लीतील सातही जिल्ह्यात लॉकडाउन सुरु होईल. राजधानी दिल्लीमध्ये कोरोनामुळे कलम 144 देखील लागू करण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अनिल बैजल यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी दिल्लीचे सात जिल्हे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या संक्रमणाचा प्रसार रोखण्याच्या सरकारी आदेशानंतर, देशाची राजधानी दिल्लीतील मध्य दिल्ली, पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, ईशान्य दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली यांना  बंद केले जाईल. उद्या सकाळी 6 वाजेपासून हा लॉकडाऊनचा आदेश लागू होईल. या आदेशानंतर दिल्लीच्या सर्व सीमा सीलबंद होतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे, 23 मार्च 31 मार्चपर्यंत दिल्लीत लॉकडाउन असेल. सार्वजनिक वाहतूक बंद राहील तर फक्त 25 टक्के डीटीसी बसेस धावतील. (हेही वाचा: Coronavirus: महाराष्ट्रात जमावबंदी लागू; आज रात्रीपासून राज्यातील एसटी, बस सेवा बंद; फक्त जीवनावश्यकच गोष्टी चालू)

या काळात दिल्लीतील दुकाने, बाजारपेठा बंद राहतील. मात्र इतर राज्यांमधून अन्न आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय सर्व धार्मिक स्थानेदेखील बंद राहतील. दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार, देशातील राज्य सरकारांनी 75 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. हे असे 75 जिल्हे आहेत, जिथे सर्वाधिक कोरोना विषाणूजन्य रुग्ण आढळले आहेत किंवा या जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.