U Stalin, DMK, A Raja, Sanatana Dharma, HIV, यू स्टॅलिन, द्रमुक, ए राजा, सनातन धर्म, एचआयव्ही, Sanatana Dharma Row,

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी केलेले सनातन धर्मावरील वादग्रस्त विधान सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. हा विवाद अजून शांत झाला नाही तोपर्यंत द्रमुकच्या आणखी एका नेत्याने सनातम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. द्रमुकचे ए राजा (A Raja) यांनी सनातन धर्माचा अपमान करून त्याची तुलना एचआयव्हीशी केली आहे. राजा म्हणाले- 'सनातन धर्म हा एक सामाजिक रोग आहे, जो कुष्ठरोग आणि एचआयव्ही पेक्षा जास्त प्राणघातक आहे.’

ए राजा पुढे म्हणाले, ‘उदयनिधींची सनातनबद्दलची भूमिका अतिशय मवाळ होती कारण त्यांनी त्याची तुलना मलेरियासारख्या आजाराशी केली, परंतु प्रत्यक्षात सनातनची तुलना एचआयव्हीशी केली पाहिजे.’ ए राजा यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा राजकीय गदारोळ माजला आहे.

यावेळी ए राजा यांनी पीएम मोदींवरही निशाणा साधला. ए राजा म्हणाले, 'आज पीएम मोदी मंत्रिमंडळातील लोकांना बोलावून सनातन धर्माच्या संवर्धनाविषयी बोलत आहेत. मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना आव्हान दिले आहे की, सनातन धर्म किंवा त्याबद्दल वाद घालायचा असेल तर मी त्यासाठी तयार आहे. यासाठी तुम्ही दिल्लीत 1 कोटी लोकांच्या जमावाला हाक मारा, तुमच्या शंकराचार्यांनाही मंचावर बसवा. तुम्ही तुमचे सर्व धनुष्यबाण, भाले, तलवार सोबत आणा आणि मी फक्त आंबेडकर आणि पेरियार यांची पुस्तके घेऊन येईन.'

द्रमुक खासदार म्हणाले, 'तुमच्यासोबत जगतगुरू आहेत आणि मी एक सामान्य व्यक्ती आहे. तुमच्या दृष्टीने मी साधारण पाचवा शूद्र आहे. तुम्ही जिथे बोलाल तिथे मी यायला तयार आहे. मी येईन पण हिंदी बोलणार नाही. मी फक्त इंग्रजी बोलेन आणि इंग्रजी कळत नसेल तर त्याला मी जबाबदार नाही.’ (हेही वाचा: Sanatan Dharma Row: 'सनातन धर्म' वक्तव्यावरुन वाद; उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खडगे यांच्यावर उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये गुन्हा दाखल)

ए राजा यांच्या वक्तव्यावर भाजपकडूनही प्रतिक्रिया उमटली आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी लिहिले की, ‘उदयनिधीनंतर ए राजा सनातन धर्माचे अध:पतन करण्याचा प्रयत्न करत आहेत. सनातन धर्माचे पालन करणाऱ्या देशातील 80 टक्के जनतेला ते लक्ष्य करत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीचे हे वास्तव आहे. हिंदूंना अपमानित करून निवडणुका जिंकता येतात, असे त्यांना वाटते.’