Udhayanidhi Stalin | Photo Credit - Facebook)

तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि डीएमके (DMK) नेता उदयनिधी स्टॅलीन (Udhayanidhi Stalin) आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांचे चिरंजीव प्रियंक (Priyank Kharge) यांच्या विरोधता पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. एका वकिलाने दिलेल्या तक्रारीवरुन उत्तर प्रदेश राज्यातील रामपूर येथे हा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त वृत्तसंस्था पीटीआयने दिला आहे. ज्युनिअर स्टॅलीन यांनी 'सनातन धर्म' (Sanatan Dharma) संपायला हवा अशा आशयाचे विधान केले. तर, ज्युनिअर खडगे यांनी त्या विधानाला सहमती दर्शवत पाठिंबा दिला, असा तक्रारकर्त्याचा आरोप आहे. त्यावरुनच हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते.

उदयनिधी आणि प्रियंक या दोघांवरही भादंसं कलम 295 (धार्मिक भावना भडकवण्यासाठी हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) आणि 153-A (विविध धार्मिक गटांमधील तेढ वाढवणे) अन्वये सिव्हील लाईन पोलीस स्टेशन दप्तरी गुन्हा दाखल झाला आहे. वकिल हर्ष गुप्ता आणि राम सिंह लोधी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्युनिअर स्टॅलीन यांनी केलेले विधान आपणास प्रसारमाध्यमांतून समजले. ते ऐकून आणि पाहून आपल्या भावना दुखावल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे.

उदयनिधी स्टॅलीन यांच्या विधानाचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. खास करुन भाजप आणि हिंदुत्त्ववादी पक्ष, संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्या येथील अचार्य परमहंस यांनी तर थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून ज्यु. स्टॅलीन यांचा वेगवेगळ्या माध्यमातून निषेध करण्यात येतो आहे. दरम्यान, ज्युनिअर स्टॅलीन यांनी मात्र आपण आपल्या विधानावर ठाम असून त्याबद्दल कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. सनातन धर्मात जातीयता आहे. नव्या संसद भवनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपदी द्रौपदी मूर्मू यांना न बोलावणे हे त्याचे ताजे उदाहरण असल्याचे उदयनिधी यांनी म्हटले आहे.

ट्विट

दरम्यान, द्रमुकचा पाठिमागील अनेक दशकांपासून सनातन धर्माला विरोध केला आहे. त्यांचा हा विरोधत पेरियार यांच्या तर्कसंगत तत्त्वांवर आधारित आहे. विशेष म्हणजे द्रमुकने घेतलेल्या भूमिकेचा त्यांना राकीय फायदाही झाला आहे. लोकांच्या एका मोठ्या वर्गावर सनातन धर्माच्या अभ्यासकांनी पिढ्यानपिढ्या अत्याचार केला. त्यांना समानता, शिक्षण, धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश नाकारण्यासाठी जातीचा वापर करण्यात आला, असा पेरियार यांच्या विचारांचा दाखला देत द्रमुक भूमिका मांडत आला आहे.