Udhayanidhi Stalin On Sanatana Remark: उदयनिधी स्टॅलिन यांचा 'सनातन धर्म' वादावरुन पुन्हा हल्ला, दिले उदाहरणासह स्पष्टीकरण
Udhayanidhi Stalin | Photo Credit - Facebook)

सनातन धर्म (Sanatana Dharma) "निर्मूलन केले पाहिजे" अशी टिप्पणी केल्यानंतर तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) हे देशभरात चर्चेला आहे आहेत. खास करुन भाजप आणि हिदुत्त्ववादी संघटनांनी त्यांच्या विधानावर जोरदार प्रतिक्रिया दिली. देशात एक वादसदृश्य वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ज्युनिअर स्टॅलीन यांनी आता पुन्हा एकदा या वादावरुन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हे प्रत्युत्तर देताना त्यांनी उदाहरणासह स्पष्टीकरण दिले आहे. 'केंद्र सरकारने नवीन संसदेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना निमंत्रित न करणे हे सनातन जातीच्या भेदभावाचे उदाहरण आहे', असे ते म्हणाले. या विषयावर आपण केवळ द्रमुकची (DMK) दीर्घकाळापासूनची भूमिका अधोरेखित केली, असेही ते म्हणाले.

द्रमुकचा पाठिमागील अनेक दशकांपासून सनातन धर्माला विरोध केला आहे. त्यांचा हा विरोधत पेरियार यांच्या तर्कसंगत तत्त्वांवर आधारित आहे. विशेष म्हणजे द्रमुकने घेतलेल्या भूमिकेचा त्यांना राकीय फायदाही झाला आहे. लोकांच्या एका मोठ्या वर्गावर सनातन धर्माच्या अभ्यासकांनी पिढ्यानपिढ्या अत्याचार केला. त्यांना समानता, शिक्षण, धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश नाकारण्यासाठी जातीचा वापर करण्यात आला, असा पेरियार यांच्या विचारांचा दाखला देत द्रमुक भूमिका मांडत आला आहे.

उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्मावर केलेल्या टीकेवरुन निर्माण झालेल्या वादावर बोलताना आज ठासून सांगितले की, आपण केलेल्या वक्तव्यासंदर्भात आपण कणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहोत. दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांनी X वर दावा केला आहे की त्यांनी तामिळनाडूच्या राज्यपालांना पत्र लिहून उदय यांच्यावर कारवाई करण्यास परवानगी मागितली आहे.

सामाजिक भेदभावाचे सध्याचे उदाहरण देऊ शकता का, असे विचारले असता उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, "नवीन संसदेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती मुर्मू यांना आमंत्रित न करणे हे सध्याच्या सनातन भेदभावाचे सर्वोत्तम उदाहरण आहे".