
अयोध्येमध्ये (Ayodhya) राममंदिराच्या (Ram Temple) उद्घाटनानंतर दररोज लाखोंच्या संख्येने भाविक रामलल्लाचे दर्शन घेत आहेत. अशात आता येत्या 17 एप्रिल रोजी राम नवमी (Ram Navami 2024) साजरी होणार आहे, त्यामुळे अयोध्येमधील भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. आता श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस, चंपत राय यांनी शनिवारी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर रामलल्लाचे आशीर्वाद घेण्यास उत्सुक असलेल्या भाविकांच्या गर्दीबाबत, अयोध्या शहरासमोरील आव्हानांवर प्रकाश टाकला.
राय यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रोज एक ते दिड लाख भाविक रामलल्लाचे दर्शन घेत आहेत. मात्र राम नवमी जवळ येत असल्याने इथली गर्दी वाढेल आणि अयोध्या एवढ्या मोठ्या मेळाव्याला सामावून घेण्यास तयार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राय यांच्यामते यावेळी ‘उष्णता’ हे सर्वात मोठे आव्हान ठरू शकते.
रामनवमी दरम्यान 2 लाखांहून भाविक अयोध्येला भेट देतील अशी अपेक्षा ठेवून, राय म्हणाले की, यावेळी अन्न आणि पाण्याच्या सोयीसाठी प्रथम प्राधान्य राहील. ते म्हणाले या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, मात्र पुरेसे अन्न हे आव्हान आहे. एप्रिलमधील उष्णता पाहता, दाह कमी करण्यासाठी राय यांनी भक्तांना त्यांच्यासोबत 'सत्तू' आणण्याचे आवाहन केले. सत्तू हे पारंपारिक पीठ त्याच्या थंड गुणधर्मासाठी ओळखले जाते. चंपत राय म्हणाले की, अयोध्येत येणाऱ्या भाविकांनी त्यांच्यासोबत सत्तू आणून ते खावे. त्यामुळे त्यांना उष्णतेपासून आराम मिळेल. (हेही वाचा: Sleep Deprivation: कोविडनंतर निद्रानाशाच्या समस्येमध्ये वाढ; 61% भारतीय लोक 6 तासांपेक्षा कमी शांत झोप घेतात- Survey)
दुसरीकडे, अयोध्येत यावेळी रामनवमी खूप खास असणार आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येथे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर श्री रामजन्मभूमी मंदिर 15 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत 24 तास खुले राहणार आहे. गरज पडल्यास 18 एप्रिललाही श्री राम मंदिर 24 तास उघडे ठेवण्याचा विचार केला जाईल. अयोध्येमध्ये अभ्यागतांची वाढती संख्या असूनही आतापर्यंत चेंगराचेंगरीची कोणतीही घटना टाळण्यात यश मिळवले आहे आणि भविष्यातही अशी कोणतीही परिस्थिती उद्भवली जाऊ नये यासाठी काळजी घेण्यात येणार आहे.