ज्येष्ठ राजकीय नेते गुलाम नबी आजाद (Ghulam Nabi Azad) यांनी आज (26 ऑगस्ट) काँग्रेस पक्षातील प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. त्या अर्थाने ते काँग्रेसमधून आजाद झाले. पुढच्या वाटचालीबद्दल त्यांनी कोणतीच घोषणा केली नाही. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना मात्र 5 पानांचे एक पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेस सोडण्याच्या कारणांसोबतच नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावरही बरीच नाराजी व्यक्त केली आहे. खरे तर 2014 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक आणि त्यानंतरच्या जवळपास सर्वच पराभवांचे खापर आजाद यांनी राहुल गांधी यांच्यावर फोडले आहे.
सोनिया गांधी यांना लिहीलेल्या पत्रा गुलाम नबी आजाद यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांना 2013 मध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष बनविण्यात आले. त्यानंतर त्यांनी पक्षातील सल्लामसलतीला पूर्णपणे फाटा दिला. ती संस्कृतीच त्यांनी रद्द केली. सर्व वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांना त्यांनी बाजूला केले आणि कोणताही अनुभव नसलेले केवळ तोंडचाटकी मंडळी (चाटुकार) लोक पक्ष चालवू लागले.
राहुल गांधी यांनी अध्यादेशाची कॉपी फाडण्याच्या घटनेचाही नोंद आजाद यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात घेतली आहे. राहुल यांची ही कृतीच पुढे लोकसभा निवडणूक 2014 च्या पराभवाचे प्रमुख कारण ठरली. अध्यादेशाची प्रत प्रसारमाध्यमांपुढे फाडणे हे राहुल गांधी यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे कारण होते. अशा काही बालिश गोष्टींमुळे पक्षाची आतोनात हानी झाली. त्यासोबत पंतप्रधान आणि भारत सरकारच्या अधिकारांनाही त्यांनी नष्ट केले. 2014 मध्ये यूपीए सरकारच्या पराभावाला ही घटना सर्वाधीक जबाबदार ठरली. वाचकांच्या माहितीसाठी असेकी, राहुल गांधी यांनी यूपीए सरकारने काढलेल्या एका आदेशाची प्रत फाडली होती आणि तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात होते.
गुलाम नबी आजाद पुढे लिहितात, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विविध राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला जोरदार हार पत्करावी लागली. पक्षाचा इतका अपमानीत पराभव कधीच झाला नव्हता. तसेच पक्ष केवळ चार राज्यांमध्ये विजयी झाला. याशिवाय सहा वेळा पक्ष आघाडीच्या स्थितीमध्ये आला आणि आघाडी करण्यास असमर्थ ठरला. आज काँग्रेस केवळ देशभरामध्ये दोन राज्यांमध्ये सत्तेत आहे. आणि इतर दोन राज्यांमध्ये आघाडी करुन सत्तेत आहे.
ट्विट
Congress leader Ghulam Nabi Azad severs all ties with Congress Party pic.twitter.com/RuVvRqGSj5
— ANI (@ANI) August 26, 2022
गुलाम नबी आजाद यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे की, यूपीए सरकारच्या संस्थात्मक अखंडतेला नख लावण्याचा उद्योग 'रिमोट कंट्रोल मॉडेल' द्वारा करण्यात आला. हे मॉडेल आता काँग्रेसमध्येही लागू झाले आहे. सर्वात महत्त्वाचे निर्णय हे राहुल गांधी यांच्यापेक्षा त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि खासगी सचिव यांच्याद्वारेच घेतले जाऊ लागले आहेत.