Rahul Gandhi | (Photo Credits: Twitter/ANI)

Rahul Gandhi Attacks Center in Cambridge Lecture: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी केंब्रिज विद्यापीठात (University of Cambridge) व्याख्यान देताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आरोप केला की, भारतीय लोकशाहीच्या मुलभूत संस्थांवरच हल्ला केला जात आहे. खास करुन इस्त्रायली स्पायवेअर पेगासस वापरून भारतातील अनेक लोकांच्या फोनवर पाळत ठेवली जात आहे. माझ्याही फोनवर पेगासस वापरण्यात आला. गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनीही आपल्याला फोनवर बोलताना काळजी घ्यायला सांगीतली होती. आपले फोन रेकॉर्ड केले जात असल्याचे या अधिकाऱ्याने आपल्याला सांगितल्याचेही राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठातील व्याख्यानादरम्यान सांगितले.

राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात 'लर्निंग टू लिसन इन द 21 सेन्च्युरी' (Learning to Listen in the 21st Century) या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानाची YouTube लिंक काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे माजी सल्लागार सॅम पित्रोदा यांनी शेअर केली आहे. या व्याख्यानात राहुल गांधी सांगताना दिसतात की, माझ्या स्वत:च्या फोनवर पेगासस द्वारे नियंत्रण ठेवले जात असे. या वेळी मला एका गुप्तचर अधिकाऱ्याने बोलावून सांगितले होते. फोनवर बोलताना काळजी घ्या. आपले फोन रेकॉर्ड केले जात आहेत. (हेही वाचा, Rahul Gandhi New Look: राहुल गांधींचा केंब्रिजमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

भारतातील विरोधी पक्ष, लोकशाहीच्या मुलभूत यंत्रणा संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधकांवर कारणाशिवाय खटले भरले जात आहेत. अनेकदा अनेक प्रकरणांमध्ये तथ्य नसते. तरीही खोट्या आरोपांखाली खटले भरले जात आहे. माझ्यावरही अनेक खटले आहेत. ज्यांची काहीच आवश्यकता नव्हती. पण, तरीही ते भरले गेले आहेत. असे खटले भरले गेलेला मी एकटाच नाही. असे अनेक लोक आहेत. आम्ही त्याविरोधातही लढतो आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, स्नूपिंगसाठी पेगाससचा वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाठिमागच्या वर्षी एक समिती नेमली होती. या समितीने निष्कर्ष काढला की, तपासल्या गेलेल्या 29 मोबाईल फोनमध्ये स्पायवेअर आढळले नाही. पण मालवेअर आढळले.