उत्तर-पश्चिम जिल्ह्यात एका दिल्ली (Delhi) पोलिस कॉन्स्टेबलने त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Shoot Suicide) केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून घटनेचा तपास सुरू केला आहे. अधिका-यांनी शनिवारी सांगितले की, दिल्लीच्या प्रशांत विहारमधील एका प्रवाशाने त्यांना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास माहिती दिली की परिसरातील पेट्रोल पंपाच्या सीमा भिंतीजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये एक मृतदेह पडलेला आहे. पोलिस उपायुक्त (रोहिणी) प्रणव तायल यांनी सांगितले की, जेव्हा पोलिसांचे पथक तेथे पोहोचले तेव्हा त्यांना सँट्रो कारच्या ड्रायव्हर सीटवर एक मृतदेह पडलेला आणि त्यातून दुर्गंधी येत असल्याचे आढळले.
मृताचे नाव कॉन्स्टेबल अमनदीप सिंह असे होते, जो प्रशांत विहार पोलिस स्टेशनमध्ये तैनात होता आणि तो प्रासंगिक रजेवर होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. फोटो आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांसह गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. डीसीपी म्हणाले की त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे आणि कलम 174 सीआरपीसी (पोलिसांनी आत्महत्येची चौकशी करून अहवाल देणे) अंतर्गत चौकशीची कार्यवाही सुरू केली आहे. (हे देखील वाचा: Supreme Court On Nupur Sharma: नुपूर शर्माला सुप्रीम कोर्टाने फटकारले; म्हणाले, 'तुमच्यामुळे देशाची सुरक्षा बिघडली, असभ्य भाषेसाठी माफी मागा')
कॉन्स्टेबलचा मृतदेह बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पाठवण्यात आला असून, मृत हवालदाराचे कुटुंबीय आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. हवालदाराने हे पाऊल कशामुळे उचलले याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.