देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रकोप वाढत आहे. सातत्याने वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 23 सप्टेंबर रोजी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह आढावा बैठक (Review Meeting) घेणार आहेत. या बैठकीत 7 राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली (Delhi), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) यांच्यासह इतर काही राज्यांचे मुख्यमंत्री कोविड-19 आढावा बैठकीत सहभागी होतील.
कोरोना व्हायरसचे संकट सुरु झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबत नियमित बैठका घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतात. तसंच ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. त्या मुख्यमंत्र्यांशी बैठकीतून चर्चा केली जाते. यापूर्वी कोविड-19 संदर्भातील आढावा बैठक 11 ऑगस्ट रोजी झाली होती. या बैठकीत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या 10 राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश होता. (Coronavirus in India Updates: देशातील 60% सक्रीय रुग्ण केवळ 5 राज्यांमध्ये; 13 राज्यांमध्ये कोविड-19 च्या 5000 हून कमी Active Cases)
दरम्यान, सध्या देशातील 60% सक्रीय रुग्ण हे 5 राज्यांत असून 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 5000 हून कमी अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तसंच देशातील कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या नक्कीच दिलासादायक आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत जगात भारत प्रथमस्थानी आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसंच मृत्यूदरातही घट होत आहे. (Coronavirus in India Updates: कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत प्रथमस्थानी; सुमारे 80% रुग्णांची कोरोनावर मात)
आरोग्य मंत्रालयाच्या लेटेस्ट अपडेटनुसार, सध्या भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 54,00,620 वर पोहचला आहे. त्यापैकी 10,10,824 सक्रीय रुग्ण असून 43,03,044 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोना संसर्गामुळे तब्बल 86,752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मागील 24 तासांत नव्या कोरोना बाधित 92,605 रुग्णांची भर पडली असून 1,133 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.