Narendra Modi Ramleela Maidan Speech | Photo Credits: Twitter / ANI

नागरिकत्व कायद्यावरून देशभरात आंदोलनं सुरू आहेत. यावर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांनी रामलीला मैदानावरून जनतेला संबोधित केले आहे. दरम्यान नागरिकत्व कायदा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विविध राजकीय पक्षाकडून नागरिकत्त्व कायद्याविषयी भ्रम पसरवला जात आहे. कुठल्याच योजनांसाठी जात, धर्म पाहिला नसल्याचं सांगत विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. यावेळेस CAA हिंसाचारावरून विरोधकांवर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांना त्यांचा 'रोष माझ्यावर (नरेंद्र मोदी) काढा पण गरिबांच्या झोपड्यांना, रिक्षाला हात लावू नका. असं म्हणत खडसावलं आहे.

नागरिकत्व कायद्यामुळे हिंदू, पारशी, शिख धर्मीयांना आता नागरिकत्व कायद्यामुळे त्यांचे हक्क मिळाले आहेत. मात्र काही लोक नागरिकांमध्ये भीती पसरवत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान मोदींनी एकाच सत्रात लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये नागरिकत्व विधेयक मंजूर केल्याने त्यांचे आभार मानले आहेत. दिल्ली: CAB मंजूर झाल्यानंतर पाकिस्तानमधून भारतात दाखल झालेल्या कुटुंबाने साजरा केला आनंदोत्सव; लेकीचं नाव ठेवलं 'नागरिकता'! हा  दाखला देत शरणार्थींच्या फायद्यासाठी असलेला CAA  भारततील मुस्लिमांच्या विरोधातील नसल्याचं म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल 

रामलीला मैदानात आयोजित सभेमध्ये नरेंद्र मोदींनी जुन्या योजना लागू करतानाही जात, धर्म पाहिला नसल्याचं सांगितले आहे. त्यामुळे CAA देखील देशाच्या फायद्यासाठी असल्याचा पुनरूच्चार केला आहे. यावेळी त्यांनी 'सबका साथ, सबका विकास'चा हा मंत्र दिला आहे. नागरिकत्व कायद्यावरून अफवा पसरवत काहीजण केवळ भारताची बदनामी करत असल्याचा आरोप मोदींनी विरोधकांवर लावला आहे.

माझ्यावर रोष असेल तर तो माझ्यावर काढा पण देशाची संपत्ती, गरीबांच्या घराला हात न लावण्याचा इशारा मोदींनी आंदोलकांना दिला आहे. तसेच ज्या पोलिसांवर हल्ले करणार्‍यांनाही खडे बोल सुनावताना असं करून काय मिळणार आहे? असे म्हणत पोलिसवाले कुणाचे दुश्मन नसल्याचे सांगत पोलिस दलाच्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान NRC वरूनही कॉंग्रेस पक्षांंवर मोदींनी टीका केली आहे. काही अर्बन नक्षल अफवा पसरवताना मुस्लिमांची दिशाभूल करत आहे असे म्हटले आहे. 2014 पासून एनआरसीवर चर्चा का केली  नाही असं म्हटलं आहे.

दरम्यान रॅलीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, अशोक गेहलोत यांच्या समर्थनाचे दाखले दिले आहेत. तसेच ममता बॅनर्जींच्या भूमिकेचादेखील यावेळेस त्यांनी खरपूस समाचार घेतला.