Indian Currency | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Parbhani News: परभणी येथील 19 वर्षीय युवकाने केलेले कृत्य पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. तर, सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. विशाल खरात असे या तरुणाचे नाव आहे. या पठ्ठ्याने चक्क घरातच बनावट नोटा (Counterfeit Notes) छापण्यास सुरुवात केली होती. धक्कादायक म्हणजे तो, घरातच डिझाईन तयार करुन प्रिंटरवर 200 रुपयांच्या नोटा छापत असे. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून विशाल खरात याला अटक केली. तसेच, त्याच्याकडून नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारा प्रिंटर, कागद आणि काही नोटाही जप्त केल्या. त्याच्या विरोधात मानवत पोलीस ठाण्यात भादंसं कलम 420, 489(अ), 489(क), 489(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, परभणी पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक नियमीतपणे गस्त घालत होते. या वेळी पोलिसांना परभणीच्या मानवत (Manwath) भागात बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी प्राप्त माहितीवरुन कोणताही वेळ न दवडता तातडीने सदर ठिकाणी छापा टाकला. या वेळी विशाल खरात याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी कली. तसेच, घराची झडतीही घेण्यात आली. या वेळी केलेल्या कसून चौकशीदरम्यान पोलिसांनी विशालकडे 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. ज्या जप्त करण्यात आल्या. (हेही वाचा, Sovereign Gold Bond Scheme: सोन्यात गुंतवणूकीची मोठी संधी, सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत सार्वभौम गोल्ड बाँड खरेदी करा, मिळू शकतो दमदार परतावा; घ्या जाणून)

पोलिसांनी केलेल्या अधिकच्या तपासात पुढे आले की, विशाल खरात याच्याकडे 200 रुपये किमतीच्या एकाच क्रमांकाच्या 27 नोटा आढळून आल्या. तर दुसऱ्या क्रमांकाच्या त्याच किमतीच्या दोन नोटा त्याच्याकडे होत्या. अशा सर्व मिळून त्याच्याकडे 30 नोटा होत्या. ज्या त्याने त्याच्याकडील साहित्य वापरुन छापल्या होत्या.

विशाल खरात याच्याकडून पोलिसांनी रिफील इंक, पिवळ्या रंगाचा द्रव पदार्थ करण्यासाठी वापरली जाणारी बॉटल, पिक्समा कंपनीचे जी 2010 प्रिंटर, गुलाबी आणि पोपटी रंगाची चिकटपट्टी, पांढरे कागद आणि सुमारे ११५ कागद ज्यांच्या दोन्ही बाजूला 200 रुपयांच्या नोटा छापल्या होत्या, असा सर्व मुद्देमाल जप्त केला. विशालकडून एकूण 10 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.