पाटणा: एकाच व्यक्तीला मिळाल्या 3 सरकारी नोक-या, 30 वर्षांपासून घेत होता 3 पगार
Representative Image (Photo Credits: File)

आजच्या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी (Government Job) मिळविणे हे खूपच मोठं अवघड आणि जोखमीचे काम झालय असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात सुरक्षित नोकरी म्हणून पाहिले जाणारी सरकारी नोकरी मिळाली म्हणजे त्या व्यक्तीचे जीवन धन्य झाले अशी सध्याची अवस्था आहे. मात्र असं असतानाही पाटणामध्ये एक चमत्कारिक असा प्रकार घडलाय. येथे एक व्यक्ती गेली 30 वर्षे 3 सरकारी नोक-यांवर कार्यरत होता. इतकच नव्हे तर त्याला 3 नोक-यांचे 3 पगार मिळायचे.

सुरेश राम असे या आरोपीचे नाव असून सध्या तो फरार आहे.

डीएनए ने दिलेल्या वृत्तानुसार, सुरेश राम हा गेल्या 30 वर्षांपासून एकाचवेळी किशनगंज येथील बांधकाम विभागाचे कार्यालय आणि जलसंधारण विभागाच्या बांका व भीमनगर पूर्व येथील कार्यालयांमध्ये सहायक अभियंता पदावर नोकरी करत होता. तसेच या तिन्ही सरकारी नोक-यांचे त्याला 3 पगारही मिळायचे. मात्र सरकारच्या सीएफएमएस या यंत्रणेमुळे सुरेश राम यांची हे पितळं उघडकीस पडले. यानंतर त्याच्यावर तिन्ही ठिकाणांहून गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या सुरेश राम फरार असून पोलीस त्याचा तपास घेत आहेत.

हेही वाचा- MUHS Recruitment 2019: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीच्या विविध संधी; जाणून घ्या पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहिती

सुरेश राम 1988 पासून पाटणा येथील बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कामाला लागला होता. याचदरम्यान त्याला जलसंधारण विभागातील नोकरीसाठी कॉल आला. मात्र त्याने ती नोकरही स्विकारली.

विशेष म्हणजे तिन्ही ठिकाणी नोकरी करताना त्याला बढती मिळाली होती. थोडक्यात गेली 30 वर्षे प्रशासनाच्या डोळ्यात जी धूळ फेकत होता, त्याच्या खोटेपाणा अखेरीस प्रशासनाने उघडकीस आणला.