Yogi Adityanath | (Photo Credits: ANI)

अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन (Ram Mandir Bhumi Pujan) सोहळा बुधवारी (5 ऑगस्ट 2020) पार पडला. या सोहळ्याचे देशभरात कौतुक झाले. या कार्यक्रमानंतर अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या मशिदीबाबत (Ayodhya Mosque) चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, अयोध्या येथील संभाव्य मशिदीच्या भूमिपूजन कार्यक्रमावरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मशिद भूमिपूजन कार्यक्रमाला मला कोणी बोलवणार नाही आणि मी जाणारही नाही, अशी प्रतिक्रिया आदित्यनाथ यांनी दिली आहे. ते एका खासगी वृत्तवाहिणीशी बोलत होते.

योगी आदित्यनाथ यांनी आज तक या वृत्तवाहिणीशी बोलताना सांगितले की, जे माझे काम आहे ते काम मी करेन. मी नेहमी माझा धर्म आणि माझे काम प्रमाण माणून चालतो. मला माहिती आहे की, मशीद भूमिपूजनासाठी मला कोणी बोलवणार नाही आणि मी जाणारही नाही. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या येथे सन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्याचा निर्णय दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारने 5 फेब्रुवारीलाच अयोध्या जिल्हा मुख्यालयापासून 18 किलोमीटर अंतरावर धन्नीपूर तालुक्यातील सोहावल गावातील रौहानी येथे जवळपास 5 एकर जमीन अधिगृहीत केली आहे. या ठिकाणी संभाव्य मशिद उभारली जाणार आहे. (हेही वाचा, Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न; चांदीची वीट रचून मोदींनी केली रामजन्मभूमीची पायाभरणी)

दरम्यान, अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, आजचा संपूर्ण दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. राम मंदिर उभारणी भलेही राम मंदिर ट्रस्ट करेन परंतू अवधपुरीच्या भौतिक विकास आणि सांस्कृतिक वारसा संपन्न बनविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.