NEET, JEE 2020: 'मन की  बात'मध्ये परीक्षांवरील चर्चेऐवजी खेळण्यांवर चर्चा; राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांना ट्विटद्वारे टोला
Rahul Gandhi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मन की बात कार्यक्रमात नीट, जेईई परीक्षांसदर्भात (NEET, JEE Exam) बोलण्याऐवजी पंतप्रधान मोदी यानी खेळण्यांवर चर्चा केल्याची टीका राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी नीट आणि जेईई परीक्षासंदर्भात बोलतील, असे विद्यार्थ्यांना वाटले होते. पण ते खेळण्यांबद्दल बोलले. त्यामुळे 'परीक्षा पे चर्चा' ऐवजी 'खिलोने पे चर्चा' केली असल्याचा टोला राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले, "मन की बात मधून परीक्षेवर चर्चा होईल असे नीट-जेईई विद्यार्थ्यांना वाटले होते. पण पीएम यांनी खेळण्यांवर चर्चा केली." कोविड-19 संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नीट-जेईई परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तर देशात हा चर्चेचा मुद्धा बनला आहे. विद्यार्थी-पालक परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. मात्र परीक्षा ठरलेल्या वेळेत होणार असे NTA कडून म्हटले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांचा पुरता गोंधळ उडाला आहे. त्यावर मोदी भाष्य करतील अशी आशा असताना मोदींनी वेगळ्याच विषयावर चर्चा केल्याने राहुल गांधी यांनी मोदींवर टिकास्त्र सोडले आहे.

Rahul Gandhi Tweet:

आज झालेल्या मन की बातच्या 68 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळणी निर्मिती क्षेत्रात भारताचे योगदान वाढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी तरुण कारागिरांनी पुढे या, असे आवाहन केले आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या संबोधनात नीट आणि जेईई परीक्षांच्या मुद्दाला हात घातला नाही. (खेळणी निर्मिती क्षेत्रात भारताचा सहभाग वाढवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मन की बात' कार्यक्रमातून आवाहन)

यापूर्वी राहुल गांधी यांनी नीट आणि जेईई परीक्षांदरम्यान सरकारच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड करु नये, असे ट्विटद्वारे म्हटले होते.