Mamata Banerjee | (Photo Credits-Facebook)

पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. पश्चिम बंगालचे मंत्री फरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी यांना नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणात सोमवारी (17 मे) कोलकाता सीबीआयने अटक केली. दरम्यान, टीएमसी आमदार असलेल्या या मंत्र्यांना सीबाआय कार्यालयात घेऊन जाण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ((Mamata Banerjee) या स्वत: सीबीआय कार्यालयात (Mamata Banerjee At CBI Office) पोहोचल्या. प्राप्त माहितीनुसार, ममता बॅनर्जी या आपल्या वकीलासोबत सीबीआय (CBI) कार्यालयात पोहोचल्या होत्या. त्यांच्या वकीलांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना म्हटले की, मलाही अटक करा.

नारद स्टिंग प्रकरणाची चौकशी सुरु असून या प्रकरणात आज सकाळी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या दोन मंत्र्यांना आणि एका आमदाराला माजी मंत्री शोभन चटर्जी यांनाही केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या निजाम पॅलेस येथील कार्यालयात नेण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय पधकासोबत सीबीआयची एक टीम सोमवारी सकाळी हाकिम येथील चेतला निवासस्थानी पोहोचली आणि त्यांना चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात घेऊन गेली.

पश्चिम बंगाल राज्याचे परिवहन आणि गृहनिर्माण मंत्री हकिम यांनी दावा केला आहे की, सीबीआयने नारद प्रकरणात मला अटक केली आहे. आम्हाला या प्रकरणात न्यायालयात घेऊन जातील. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी केंद्रीय तपास यंत्रणा (सबीआय) च्या विनंतीनुसार फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांच्या विरोधात खटला चालविण्यास परवानगी दिली आहे. हकीम जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांचे नाव नारद स्टिंग प्रकरणात पुढे आले होते.

दरम्यान, नारद प्रकरणात फिरहाद हकीम यांच्याशिवाय, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांचेही नाव पुढे आले आहे. हे चारही जण या आधीच्या ममता सरकारमध्ये मंत्री होते. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हकीम, मुखर्जी आणि मित्रा तृणमूल कांग्रेस पक्षाकडून पुन्हा निवडूण आले आहेत.