JNU मधील रस्त्याला दिले वि. दा. सावरकर यांचे नाव; आइशी घोषने केला निषेध- ‘अतिशय लाजिरवाणी गोष्ट’
VD Savarkar Marg in JNU. (Photo Credit: Twitter/@aishe_ghosh)

गेल्या वर्षी दिल्ली विद्यापीठात (DU) विनायक दामोदर सावरकरांचा (VD Savarkar) पुतळा बसविल्याबद्दल खळबळ उडाली होती. तत्कालीन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शक्ती सिंह यांनी परवानगीशिवाय, उत्तर कॅम्पसच्या कला शाखेच्या गेट येथे व्ही.डी. सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांचे पुतळे बसविले होते. या गोष्टीनंतर अनेक विद्यार्थी संघटनांनी यावर आक्षेप घेतला. कॉंग्रेसच्या विद्यार्थी युनिट एनएसयूआयने सावरकरांच्या पुतळ्यावर काळी शाईही फेकली होती. बर्‍याच गोंधळानंतर शेवटी ते पुतळे तेथून काढावे लागले. आता जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) एका रस्त्याला विनायक दामोदर सावरकर असे नाव दिले आहे.

या प्रकारामुळे पुन्हा एकदा गोंधळ माजला आहे. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आइशी घोषने (Aishe Ghosh) याचा निषेध केला आहे. आइशी घोषने आपल्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुबनसीर वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नाव व्ही.डी. सावरकर मार्ग असल्याचे स्पष्ट होत आहे. आइशी लिहिते, 'सावरकर यांचे नाव रस्त्यासाठी देणे ही जेएनयूसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सावरकर आणि त्यांच्या लोकांसाठी विद्यापीठात कधीच स्थान नव्हते आणि ते कधीच नसणार.’ (हेही वाचा: स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा 'संघ' परिवार कोठे होता? सावरकर मुद्द्यावरुन शिवसेनेचा रोखठोक सवाल)

जुलै 2019 मध्ये, जेएनयू कॅम्पस डेव्हलपमेंट कमिटीने कार्यकारी परिषदेसमोर, अनेक रस्त्यांची नावे बदलण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक आणि प्रसिद्ध व्यक्तींचा नावांची शिफारस केली होती. त्यानुसार आता हे नाव बदलण्यात आले आहे. गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला या रस्त्याचे नाव व्ही.डी. सावरकर मार्ग असे ठेवण्याचे ठरले होते. यासाठी, जेएनयू रोड, गुरु रविदास मार्ग, राणी अब्बाका मार्ग, अब्दुल हमीद मार्ग, महर्षि वाल्मीकी मार्ग, राणी झांसी मार्ग, वीर शिवाजी मार्ग, महाराणा प्रताप मार्ग आणि सरदार पटेल मार्ग अशी नावे सुचविण्यात आली. या नावांचा विचार केल्यानंतर जेएनयू कार्यकारिणीने व्ही.डी. सावरकर मार्गाच्या नावावर सहमती दर्शविली.