केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकर (Nitin Gadkari) यांनी सांगितले की, केंद्र सरकारची मुंबई आणि बेंगळुरू दरम्यान ग्रीन एक्सप्रेस हायवे (Mumbai-Bengaluru Green Express Highway) तयार करण्याची योजना आहे. या ग्रीन एक्सप्रेस हायवेमुळे सध्याचा दोन्ही शहरातील प्रवासाचा कालावधी 16-17 तासांवरून अवघे 5 तास होईल. मुंबईपासून बेंगळुरू 981.4 किमी अंतरावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रीन एक्सप्रेस हायवेमुळे पुणे आणि बेंगळुरू दरम्यानचा प्रवास वेळदेखील कमी होऊन तो फक्त 3.5 ते 4 तास असेल.
मिंटमधील एका अहवालात गडकरींच्या हवाल्याने म्हटले आहे की, केंद्र सरकार मुंबई शहर ते बेंगळुरूपर्यंत ग्रीन एक्सप्रेस हायवेची योजना आखत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग पुण्यातील रिंगरोडजवळून एक वळण घेईल आणि बंगळुरूच्या दिशेने महामार्ग म्हणून सुरू होईल. प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी सरकार पुढील तीन वर्षांत भारतभर 27 ग्रीन एक्सप्रेस हायवे बनवू इच्छित आहे. (हेही वाचा: Delhi-Mumbai Expressway: दिल्ली ते मुंबई प्रवास अवघ्या 12 तासांत; या वर्षी पूर्ण होणार महामार्गाचा पहिला टप्पा: Nitin Gadkari)
गडकरींच्या म्हणण्यानुसार या ग्रीन एक्सप्रेस हायवेमुळे 1000 किलोमीटर अंतर केवळ 5 तासात पार करणे शक्य आहे. जर एखाद्या वाहनाना 1,000 किलोमीटर (मुंबई आणि बेंगळुरूमधील अंतर) फक्त पाच तासात कापायचे असेल, तर त्या वाहनाने सरासरी 200 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करणे आवश्यक आहे. लक्षात घ्या हा 'सरासरी वेग' आहे आणि टॉप स्पीड नाही. 5 तासात 1000 किमी अंतर कापण्यासाठी वाहनाने सरासरी 230-250 किमी प्रतितास वेग राखला पाहिजे.
गडकरींनी यापूर्वी सांगितले होते की, डिसेंबर 2022 च्या अखेरीस काही नवीन महामार्ग सुरु होतील, ज्यामुळे दिल्ली ते चंदीगड, अमृतसर, कटरा आणि श्रीनगर सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाचा वेळ कमी होईल. गडकरी यांनी नुकतेच सांगितले होते की, रस्ते वाहतुकीचे नेटवर्क तयार करणे हे त्यांचे स्वप्न आहे. असाच एक महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई व दिल्लीदरम्यान तयार होत आहे. या महामार्गामुळे देशातील या दोन महत्वाच्या शहरातील प्रवासाचा कालावधी 12 तास असेल. गडकरी यांनी असेही सांगितले की, वांद्रे-वरळी सी-लिंक थेट वसई-विरार आणि मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवेशी जोडण्याचे त्यांचे स्वप्न आहे.