राज्यातील सत्ता गमावलेल्या शिवसेनेसमोर (Shivsena) आता नवी समस्या निर्माण झाली आहे. पक्षाच्या 18 लोकसभा खासदारांपैकी 13 खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होऊ शकते कारण बंडखोर आमदारांमुळे आधीच सत्ता गेली होती, आता खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तसेच आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेत खासदारही नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्याविषयी देखील चर्चा करण्यात आली. शिंदेसोबत 50 आमदार आहेत ते आजही मनाने आपलेच आहेत आपण एकनाथ शिंदेंशीही जुळवून घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपनं (BJP) सत्ता स्थापन केली आहे आपण दोघांशीही जुळवून घेतलं तर भविष्यात पक्षाचं हिताचं होणार आहे, असे देखील चर्चा झाली.
पाच खासदारांनी मारली दांडी
तत्पूर्वी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत पाच खासदारांनी दांडी मारल्याचं स्पष्ट झालं आहे. हे पाच खासदार शिंदे गटामध्ये जाणार का याबद्दल आता चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, शिवसेना खासदारांची मातोश्रीवर तब्बल पाच तास बैठक सुरू होती, त्यामध्ये एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबद्दल कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.
पक्षाने द्रौपदी मुर्मूला पाठिंबा द्यावा, असे बहुतेक खासदारांचे मत होते. तसेच द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातून आलेल्या असुन आपण त्यांना साथ दिली पाहिजे. याबाबत आपण पक्षश्रेष्ठींना कळवले असून ते एक ते दोन दिवसांत आपला निर्णय सर्वांना सांगतील, असे खासदार म्हणाले. (हे देखील वाचा: Uddhav Thackeray यांच्या कडून त्यांची साथ देणार्या 15 शिवसेना आमदारांना भावनिक पत्र)
विरोधी पक्षांशी बिघडू शकतात संबध
18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून यशवंत सिन्हा यांना विरोधकांकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने द्रौपदी मुर्मूला निवडणुकीत पाठिंबा दिल्यास विरोधी पक्षांशी असलेले संबंध बिघडतील.