महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षामध्ये 40 शिवसेना आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )यांची साथ सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला सामील झाले आहेत. दरम्यान शिवसेनेकडून अपात्रतेची कारवाई 16 जणांविरूद्ध करण्यात आली आहे. या कारवाईचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे पण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची साथ देणार्या 15 आमदारांना खास भावनिक पत्र देत आभार मानले आहेत. कुडाळचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी हे पत्र सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहे.
'निष्ठेने राहिलात, तुमच्यामुळे शिवसेनेला बळ मिळाले! शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो. अशा सदिच्छा ' असा या पत्राचा मजकूर आहे. एकीकडे साथ देणार्यांना पत्र देताना शिवसेनेकडून बंडखोरांच्या विरूद्ध कारवाईचा बडगा देखील सुरू झाला आहे. नक्की वाचा: शिवसेना आमदार संतोष बांगर यांची शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी.
वैभव नाईक यांची पोस्ट
View this post on Instagram
आमदारंपाठोपाठ शिवसेना खासदार बंडाळी करण्याच्या तयारीत असल्याची सध्या चर्चा आहे. आगामी राष्ट्रपती निवडणूकीमध्ये शिवसेनेने एनडीए च्या बाजूने मतदान करावं अशी अनेकांची इच्छा आहे. दरम्यान या मतदानाबाबतही आज खासदारांसोबत चर्चा करण्यासाठी मातोश्री वर विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या कारवाईबाबत सुनावणीसाठी घटनापीठाची गरज असल्याचं बोलून दाखवलं आहे. त्यामुळे सध्या कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना देण्याचे सॉलिसिटर जनरल यांनादेखील दिले आहेत.