Monsoon | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

देशात कोरोना व्हायरसचे महासंकट असताना आता पावसाचे सुद्धा आगमन झाले आहे. पावसाळ्याच्या काळात उद्भवणारे विविध आजार यांपासून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून देशातील विविध राज्यात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी विजेच्या कटकटांसह पावसाच्या सरी कोसळल्याचे दिसून आले आहे. तर आता पुढील 2 तासात दिल्ली, औरंगबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद, मेरुत, बिजनौर, मुझफ्फरनगर, सहासवन, बदाऊ, पालवल, होड, नूह, खुर्जा, मथुरा आणि अलवर येथे वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. याबाबत आयएमडी यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील मुंबईत सुद्धा गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरासह उपनगरातील सखल भागात पाणी साचल्याचे दिसले. तर पावसाचे पाणी साठून राहू नये म्हणून महापालिकेने पंप लावले आहेत. तर आज सकाळपासून पावसाने दांडी मारल्याने कडक ऊन पडले आहे.(Maharashtra Monsoon 2020 Forecast: मुंबई, कोकण परिसरात आज अधून मधून जोरदार सरी बरसणार; हवामान खात्याचा अंदाज)

दरम्यान, नागरिकांनी पावसाळ्याच्या काळात गरज पडल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत समुद्रकिनारी उंच लाटा उसळणार असल्याने नागरिकांनी तेथे जाण्याचे टाळावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. मच्छिमारांनी सुद्धा समुद्रात जाऊ नये असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तर दोन दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार बिहार येथे मुसळधार पावसासह वीजपडून 20 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.