Eggs | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मध्य प्रदेशचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यावर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाची देशभर चर्चा आहे. विद्यमान अन्न सुरक्षा नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत मांस आणि अंडी यांच्या खुल्या विक्रीवर बंदी (Bans Meat, Egg Sale) घालण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, याच बैठकीत सिंगल-विंडो सुविधेद्वारे मालमत्ता हस्तांतर सुलभ करण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व 55 जिल्ह्यांमध्ये सायबर तहसील योजनेच्या अंमलबजावणीलाही मान्यता देण्यात आली.

मांसाच्या खुल्या विक्रीविरोधात मोहीम:

15 ते 31 डिसेंबर या कालावधीत मांस आणि मासळीच्या खुल्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी अन्न विभाग, पोलीस आणि स्थानिक नागरी संस्था यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ही कारवाई योग्य जनजागृती उपायांचे पालन करेल यावर मुख्यमंत्री यादव यांनी भर दिला. (हेही वाचा, Nutritional Diet: शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता पोषण आहारात मिळणार अंडे अथवा अंडा पुलाव, बिर्याणी)

यात्रेकरूंचे स्वागत आणि तेंदूपत्ता तोडणाऱ्यांसाठी निर्णय:

दरम्यान, मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रभू राम मंदिराच्या मार्गाने अयोध्येला जाणाऱ्यांचे जोरदार स्वागत केले आहे. याव्यतिरिक्त, मंत्रिमंडळाने नवीन प्रोत्साहनाचा भाग म्हणून तेंदूपत्ता तोडणाऱ्यांना प्रति पिशवी ₹4,000 देण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, First Synthetic Human Embryos: बाळाच्या जन्मासाठी आता Egg, Sperm ची गरज नाही? Stem Cells च्या मदतीने वैज्ञानिकांनी बनवलं Synthetic Human Embryo-Like Structures)

लाऊड स्पीकरबाबत मोठा निर्णय

दरम्यान, सीएम मोहन यादव यांनी मध्यप्रदेशातील लाऊड स्पीकरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला आदेश जारी करून लाऊड स्पीकरच्या आवाजावर अंकुश लागू केला आहे. या आदेशानुसार धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊड स्पीकर निर्धारित डेसिबलपेक्षा जास्त वाजल्यास त्यावर बंदी घालण्यात येणार आहे. या आदेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देण्यात आला आहे.

मध्य प्रदेश राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांनी भोपाळ येथील मोतीलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात शपथ घेतली. राज्यपाल मंगुभाई सी पटेल यांनी यादव यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला यांनी शपथ घेतली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर 11 भाजप आणि एनडीए शासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी अनुक्रमे पहिल्या तिन राज्यांमध्ये भाजपने दमदार बहुमत मिळवत सत्ता हस्तगत केली आहे. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपने मुख्यमंत्री पदासाठी नवे चेहरे दिले आहेत. आगामी काळात या सरकारची कामगिरी कशी राहते याबाबत उत्सुकता आहे.