जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu - Kashmir Police) गुरुवारी 5 दहशतवाद्यांना (Terror Pperatives) अटक केली आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2020) निमित्ताने, या दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. असे सांगितले जात आहे की, हे लोक 26 जानेवारीला ग्रेनेडने हल्ला करण्याची तयारी करत होते.
आता या पाच जणांना पोलिसांनी अटक करून त्यांचा कट उधळून लावला आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये एजाज अहमद शेख, उमर हमीद शेख, इमतीयाज अहमद चिकला, साहिल फारूकी गोजरी आणि नसीर अहमद मीर यांचा समावेश आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी आणखी 2 हिजबुल अतिरेक्यांना अटक केली होती. त्यासह काश्मीर पोलिसांकडून डीएसपी देवेंद्र सिंह यांनाही अटक करण्यात आली.
In a major success the Srinagar Police busts Jaish Module.
Two grenade blasts in Hazratbal area worked out. Major attack averted ahead of Republic Day.Five terror operatives arrested.Huge Expolsive material recovered.
— J&K Police (@JmuKmrPolice) January 16, 2020
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये 8 जानेवारी रोजी सीआरपीएफ पक्षावर हल्ला झाला होता. हजरतबलजवळ हबक क्रॉसिंगवर सीआरपीएफच्या पार्टीवर, संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले. त्यानंतर याबाबत गुन्हा नोंदवून घटनेचा तपास केला गेला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजसह इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले.
तसेच गुप्तचरांनी दिलेली माहितीही गोळा केली गेली. याच्या आधारे संशयितांचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर त्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आणि जैश-ए-मोहम्मदशी (Jaish-e-Mohammad) संबंधित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. हे दहशतवादी 26 जानेवारीच्या सुमारास श्रीनगरमध्ये हल्ल्याचा कट रचत होते. या अतिरेक्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
दरम्यान, नुकतेच काश्मीरमध्ये हद्दपार झालेला डीएसपी देवेंद्र सिंह दहशतवाद्यांसह पकडला गेला. त्यावेळी या दहशतवाद्यांचे मोठे षडयंत्र समोर आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे चिडलेले होते आणि त्याचा बदला घेण्यासाठी पंजाब, दिल्ली, चंदीगडमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होते. या दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून सिंहला अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना सर्व सेवांवरून निलंबित करण्यात आले.