देशातील प्रत्येक राज्यात ‘वीज बिल’ ही मोठी समस्या बनली आहे. या महागाईच्या जमान्यात सर्वसामान्य माणूस कसे तरी आपले बिल भरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जर का कोणाला हजारो नाही, लाखो नाही तर कोठ्यावधी रुपयांचे वीज बिल आले तर त्याची काय अवस्था होईल. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमध्ये वीज विभागाने एका ग्राहकाला 3,419 कोटींचे बिल पाठवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे बिल पाहून घरातील एका वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडली व त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
हे प्रकरण मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या शिव बिहार कॉलनीत राहणाऱ्या प्रियंका गुप्ता यांच्या घराशी संबंधित आहे. प्रियांकाचे पती संजीव हे वकील आहेत. या गुप्ता कुटुंबाला 34 अब्ज, 19 कोटी, 53 लाख 25 हजार रुपयांचे वीज बिल आल्याचे त्यांनी सांगितले. हे बिल पाहून संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला. आज तकच्या वृत्तानुसार, वकील संजीव यांनी सांगितले की कोट्यवधी रुपयांचे बिल पाहिल्यानंतर त्यांची पत्नी प्रियंका आणि तिच्या वडिलांचा रक्तदाब वाढला. यामुळे हृदयाचे रुग्ण असलेल्या वडिलांना घाईघाईत रुग्णालयात दाखल करावे लागले.
ही घटना समोर आल्यानंतर याबाबत चौकशी करण्यात आली व त्यानंतर मध्य प्रदेश सरकार संचालित वीज कंपनीने 1,300 रुपयांचे योग्य बिल जारी करून ही मानवी चूक असल्याचे सांगत गुप्ता कुटुंबाला दिलासा दिला. यासंदर्भात खासदार ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर म्हणाले की, ही चूक सुधारण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. (हेही वाचा: नागरिकांवर महागाईचा वरवंटा; घरगुती गॅस पुन्हा महागण्याची शक्यता; एलपीजी सब्सिडी कमी करुन केंद्राने कमावले 11,654 कोटी)
ही मानवी चूक असल्याचे वीज कंपनीचे महाव्यवस्थापक सांगतात. या प्रकरणी सहायक महसूल अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.