दिवाळी तोंडावर असताना सर्वसामान्यांना महागाईचा एक झटका बसला आहे. आज नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder Prices) किंमतीमध्ये वाढ झाली आहे. 100 रूपयांची ही वाढ आहे. 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतींत ही वाढ झाली आहे. त्यामुळे ही गॅस सिलेंडरची दरवाढ खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंटच्या व्यवसायावर दिसून येणार आहे. यामुळे बाहेरचं खाणं आता महाग होणार आहे.
मुंबई मध्ये आज (1 नोव्हेंबर) पासून कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 1785.50 रुपये झाली आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये प्रति सिलेंडर, कोलकातामध्ये 1943 रुपयांवर पोहोचली आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1999.50 झाली आहे.
दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, चारही प्रमुख मेट्रो शहरांमध्ये 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर त्याच किंमतीमध्ये उपलब्ध असणार आहे. सध्या या गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 आहे.
महिन्याभरातच गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये 300 रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील ऑक्टोबर महिन्यात 200 आणि आता नोव्हेंबर महिन्यामध्ये 100 रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कोलकत्ता मध्ये सर्वाधिक 103 रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या होत्या.