हैदराबाद संस्थानाची शेवटचा शासक नीजाम (Hyderabad Nizam) मीर उस्मान अली खान (Mir Osman Ali Khan) याची जिवंत असलेली शेवटची थेट वंशज साहबजादी बशीरुन्निसां बेगम (Sahebzadi Basheerunnisa Begum) यांचे निधन झाले आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. नीजाम मीर उस्मान अली खान याची त्या शेवटच्या कन्या होत्या. हैदराबाद (Hyderabad) येथे मंगळवारी (28 जुलै) सकाळी पुरानी हवेली येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एकमेव कन्या रशीदुन्निसां आहेत. आयएएनएस या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
नीजामाचा नातू आणि निजाम फॅमेली वेलफेयर असोशियेशन चे अध्यक्ष नवाब नजफ अली खान यांनी आयएनएसशी बोलताना सांगितले की, साहबजादी बशीरुन्निसां बेगम साहिबा यांचे निधन हा आमच्यासाठी एक मोठा धक्का आणि पोकळीही आहे.त्या हैदराबादी संस्कृती, परंपरा आणि मूल्ये यांच्या प्रतिक होत्या. त्यांना हैदराबाद येथील जुन्या दरगाह हजरत याहिया पाशा येथे सुपुर्द-ए-खाक (दफन) करण्यात आले. त्यांच्या अंतिम संस्कारावेळी निजमा परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. (हेही वाचा, Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन का साजरा केला जातो? निजामाचे हैद्राबाद संस्थान आणि भारत सरकार यांच्यातील संघर्ष घ्या जाणून)
बशीरुन्निसां बेगम यांचा विवाह नवाब काजिम यार जंग यांच्यासोबत झाला होता. त्यांना अली पाशा नावाने ओळकले जात होते. त्यांचे 1998 मध्ये निधन झाले. मीर उस्मान अली खान हे त्या काळचे सर्वात श्रीमंत म्हणून ओळकले जात होते. त्यांचे निधन सन 1967 मध्ये झाले.