आई आणि बाळासाठी उलट्या दिशेने धावली क्रांती एक्स्प्रेस; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Express | Representational Image | (Image Credits: Facebook)

टाटागरहून (Tatanagar) भुवनेश्वर (Bhubaneswar) साठी मंगळवारी (26 ऑक्टोबर) निघालेल्या आनंद विहार-भुवनेश्वर संपर्क क्रांती एक्स्प्रेसने (Kranti Express) चक्क 2.5 किमी उलट दिशेने प्रवास केला. एक्स्प्रेसमधील महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्याने ही ट्रेन उलट दिशेने धावली. त्यानंतर माता व नवजात बालकाला टाटानगर रेल्वे स्टेशनवर सुखरुप बाहेर काढण्यात आले आणि प्राथमिक तपासणीनंतर खासमहाल येथील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. चालत्या ट्रेनमध्ये बाळाला जन्म देणाऱ्या महिलेचे नाव राणू दास असल्याचे सांगण्यात आले आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला ट्रेनच्या कोच क्रमांक-5 मध्ये प्रवास करत होती. ते ओडिशातील जलेश्वर येथे उतरणार होते. मात्र चालत्या ट्रेनमध्येच महिलेची प्रसुती झाली. तिने मुलीला जन्म दिला. मात्र तोपर्यंत ट्रेन अडीच किमी पुढे गेली होती. (धावत्या ट्रेनमध्ये डॉक्टर मिळेना; TTE ने केली महिलेची सुखरुप प्रसुती)

ट्रेनचा पुढचा थांबा असलेल्या हिजलीला पोहोचायला किमान दोन तास लागणार होते. मात्र या दरम्यान त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ट्रेन पुन्हा टाटानगर स्टेशनवरच्या दिशेने परत फिरवण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान, टाटानगर रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक रेल्वे रुग्णालयाला कळवले आणि वैद्यकीय पथकाला स्थानकावर पाचारण करण्यात आले.

ट्रेन माघारी परतल्यानंतर आई आणि बाळाला सुखरुप बाहेर काढून सदर रुग्णालयात पाठवण्यात आले. यानंतर ट्रेन पुन्हा इच्छित स्थळी रवाना झाली. दरम्यान, या प्रसंगात रेल्वे अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे आणि झटपट निर्णयाचे ट्रेनमधील प्रवाशांनी कौतुक केले.