Kerala Ragging Suicide Case: केरळमधील एका शालेय विद्यार्थ्याने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या आईने केला आहे. विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, तिच्या मुलाला टॉयलेट सीट चाटायला लावले, फ्लश चालू केला आणि त्याचे डोके आत ढकलले. यानंतर त्याने आत्महत्या केली. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. केरळ पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) 14 वर्षीय मिहिर अहमदच्या मृत्यूचा तपास करत आहे. मिहीरने 15 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. रॅगिंगनंतर विद्यार्थी तो मानसिकदृष्ट्या खचला होता व तणावाखाली होता, असेही त्याच्या आईचे म्हणणे आहे.
माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी केरळमधील कोची येथे मिहीरने अपार्टमेंटच्या 26व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधून उडी मारली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, मृत मिहिर अहमदची आई राजना पीएम यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी आपल्या मुलाच्या आत्महत्येमागे शाळेतील गुंडगिरी हे कारण मानले. माझ्या मुलाला टॉयलेट सीट चाटायला लावले, मारहाण केली, शिवीगाळ झाली आणि या सगळ्यामुळे त्याने आत्महत्या केली, असे त्यांनी लिहिले आहे. पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्येचे प्रकरण म्हणून नोंदवले होते, मात्र मृताच्या आईने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि राज्याच्या पोलीस प्रमुखांना तातडीने कारवाईसाठी पत्र लिहिले आहे.
आई राजना यांनी इंस्टा पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आमच्या मुलाच्या आत्महत्येनंतर मी आणि माझ्या पतीने, मिहीरला असे पाऊल का उचलण्यास भाग पाडले हे जाणून घेण्यासाठी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्याच्या मित्रांशी, शाळेतील सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर आणि सोशल मीडियावरील संदेश वाचल्यानंतर मिहीरसोबत रॅगिंगचा जीवघेणा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्यांच्या टोळक्याने त्याच्यावर स्कूल आणि स्कूल बसमध्ये अत्याचार केले. (हेही वाचा: Bengaluru Shocker: पालकांनी फोन काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाने केली आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफास)
त्या पुढे म्हणतात, ‘आम्ही जे पुरावे गोळा केले ते एक भयानक चित्र रंगवतात. मिहिरला मारहाण करून शिवीगाळ केली. शेवटच्या दिवशी त्याला अकल्पनीय अपमानाला सामोरे जावे लागले. त्याला जबरदस्तीने वॉशरूममध्ये नेण्यात आले आणि टॉयलेट सीट चाटायला लावली. त्याचे डोके टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करण्यात आले. या छळाला कंटाळून त्याने असे पाऊल उचलले.’ या पोस्टमध्ये त्यांनी शाळा व्यवस्थापनावरही आरोप केले आहेत. शाळा व्यवस्थापन हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.