केरळमधील (Kerla) कासारगोड जिल्ह्यात एका मुस्लिम जोडप्याने 29 वर्षांच्या संसारानंतर पुन्हा लग्न केले आहे. (Muslim Couple Gets Remarried Under Special Marriage Act) आपल्या तीन मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी त्यांनी विशेष विवाह कायद्यांतर्गत हा विवाह केला आहे. शरिया कायद्यानुसार मुलींना संपत्तीत समान अधिकार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा लग्न करावे लागले. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनी (International Women’s Day) हा विवाह विशेष विवाह कायद्या अंतर्गत पार पडला.
हा विवाह अभिनेता आणि वकील सी शुक्कूरने केला आहे. 2022 मध्ये आलेल्या 'नन्ना थान केस कोडू' या चित्रपटात शुक्कूरने वकिलाची भूमिका केली होती. शुक्कूर यांच्या पत्नी शीना या महात्मा गांधी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आहेत. दोघांनी 1994 मध्ये लग्न केले होते.दोघांनी आपल्या सुखी संसाराच्या 29 वर्षानंतर पुन्हा लग्नगाठ बांधली आहे. इस्लामिक कायद्यात मुलींना समान अधिकार नसल्यामुळे मुस्लिम दाम्पत्य शुक्कूर आणि शीना यांना हे लग्न करावे लागले.
एका फेसबुक पोस्टमध्ये, शुक्कूर यांनी लिहले होते की, "अलिकडच्या काही दिवसांत असे काही घडले ज्यामुळे आपण गेल्यावर आपल्या मुलींसाठी काय सोडणार याचा विचार करण्यास भाग पाडले." आपल्या मुलींना आपल्या मालमत्तेत पूर्ण हक्क मिळेल की नाही याची चिंता त्यांना होती.