Kerala: 'मुस्लीम लोकांच्या रेस्टॉरंटमध्ये चहा पिऊ नका, बिगर मुस्लिमांना नपुंसक बनविले जात आहे'- काँग्रेस नेते P C George यांचे वादग्रस्त विधान
MLA PC George (Photo Credits: ANI)

केरळ (Kerala) सरकारचे माजी चीफ व्हिप आणि माजी आमदार पीसी जॉर्ज (P C George) यांच्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. जॉर्ज यांनी बिगर मुस्लिमांना राज्यातील मुस्लिम लोकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. जॉर्ज यांनी शुक्रवारी हे विधान केले, परंतु आता त्यामुळे वादंग माजला आहे. केरळमधील या माजी काँग्रेस नेत्याने शुक्रवारी अनंतपुरी हिंदू महासंमेलनात सांगितले की, मुस्लिम लोकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये विकल्या जाणाऱ्या चहामुळे नपुसंकता येते. याद्वारे मुस्लीम लोक देश 'काबीज' करण्याची आशा बाळगून आहेत. स्त्री-पुरुषांना वंध्य बनवण्यासाठी हे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते पीसी जॉर्ज इथेच थांबले नाहीत तर, मुस्लिमांमध्ये काही प्रमाणात गैर-मुस्लिमांबद्दल द्वेष आहे, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, ‘मुस्लीम लोक वेळोवेळी आपला द्वेष व्यक्त करत असतात. मुस्लीम लोक खाद्यपदार्थ आणि फळांवर थुंकून ते बिगर मुस्लिमांना दिले असल्याचे, अनेक व्हिडिओ जनतेने पाहिले आहेत. यावरून ते गैर-मुस्लिमांचा किती तिरस्कार करतात हे लक्षात येते.’

जॉर्ज यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण राज्यात तीव्र निषेध केला जात आहे. जॉर्ज यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे. राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही डी साठेन यांनी आरोप केला की जॉर्ज यांच्या विधानाचा उद्देश जातीय भावना भडकवणे आणि समाजात फूट निर्माण करणे हे होते. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) ची युवा शाखा मुस्लिम युथ लीगने DGP ला तक्रार पत्र देऊन जॉर्ज यांच्याविरुद्ध FIR नोंदवण्याची मागणी केली आहे.

यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जॉर्ज यांना त्यांचे विधान मागे घेऊन जनतेची माफी मागण्यास सांगितले आहे. या विधानानंतर तिरुअनंतपुरममधील फोर्ट पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी रविवारी पहाटे जॉर्ज यांना कोट्टायम जिल्ह्यातील एरट्टुपेट्टा येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. तिरुअनंतपुरम येथील एका परिषदेत केलेल्या भाषणातून धार्मिक द्वेषाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी शनिवारी जॉर्ज यांच्या रुद्ध गुन्हा दाखल केला. (हेही वाचा: Taj Mahal Controversy: ताजमहालात शिवाची मूर्ती बसवणार; जगद्गुरु परमहंस आचार्य यांची घोषणा)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्याचे पोलीस प्रमुख अनिल कांत यांच्या सूचनेवरून फोर्ट पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी माजी आमदारावर कारवाई केली. जॉर्ज यांच्या विरुद्ध आयपीसी कलम 153A (वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अटकेनंतर आता त्यांना तिरुअनंतपुरम येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.