Coronavirus: कोरोना व्हायरस राज्यावरील आपत्ती! केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांची घोषणा
Coronavirus: Health Emergency | (Photo credit: archived, edited, symbolic images)

केरळ (Kerala)  मध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) लागोपाठ तीन रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकार तर्फे कोरोना व्हायरसला राज्यावरील आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे.  केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन (Pinarayi Vijayan) यांनी कोरोनाला राज्य आपत्ती म्हणून जाहीर केल्यानंतर सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याची आव्हान केले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा (K. K. Shailaja)  यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या निर्देशानंतर या संदर्भात अधिकृत माहिती दिली. यासोबतच चीनच्या (China) वुहान (Wuhan)  येथून आलेल्या लोकांची सरकारकडून एक यादी तयार केली जात आहे. त्यासाठी इमिग्रेशन डिपार्टमेंटशी संपर्क साधण्यात येणार असून राज्यातील करोनाच्या प्रत्येक संशयित रुग्णांकडे लक्ष देण्यात येत आहे. 'गोमुत्र प्यायल्याने, शेणाचा लेप लावल्याने होईल कोरोना व्हायरसपासून सुटका'; हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराजांचा अजब दावा

गेल्या आठ दिवसात केरळमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. आज आढळलेल्या तिसऱ्या रुग्णाला त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तर यापूर्वी कालच आणखीन एक रुग्ण केरळ मध्ये आढळला होता या तिन्ही पेशंटना आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या तिघांची प्रकृतीही सध्या स्थिर असली तरी कोरोनावर ठोस उपाय अद्याप मिळालेला नसल्याने या रोगाची बाधा होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान चीन मध्ये आतापर्यंत या व्हायरस मुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 300च्या पार गेला आहे. या बाधित भागातून भारतीय नागरिकांना पुन्हा मायदेशी आणणारी एअर इंडिया कडून खाजगी विमानाची सोय करण्यात आली होती. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरू असून आतापर्यंत 5, 128 प्रवासी तपासण्यात आले आहेत.