Hindu Mahasabha president Swami Chakrapani Maharaj. (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) ... ज्याने आजकाल सर्वांना घाबरवले आहे. चीनमध्ये उद्भवलेला हा विषाणू आता संपूर्ण जगात पसरला आहे. त्याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. हैदराबाद, मुंबई, पुणे, दिल्लीमध्येही या व्हायरसचे संशयित रुग्ण आढळले आहेत. हा रोग डॉक्टरांनाही आश्चर्यचकित करणारा आहे, ज्यावर अजूनही ठोस लस सापडली नाही. अशात हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज (Hindu Mahasabha President Swami Chakrapani Maharaj) यांनी, हा विषाणू टाळण्यासाठी एक उपचार पद्धती सांगितली आहे, जी आता चर्चेचा विषय ठरली आहे.

चीनपासून सुरू झालेल्या या आजारावर उपचार शोधण्यात डॉक्टर, शास्त्रज्ञ गुंतले आहेत. त्याचवेळी हिंदु महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी एक विचित्र उपाय सांगितला आहे. ते म्हणाले की, या प्राणघातक कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी गोमूत्र (Cow Urine) आणि शेणाचा वापर केला जाऊ शकतो. गोमुत्राचे सेवन करून या विषाणूचा परिणाम दूर होईल. इतकेच नाही तर एखादी व्यक्ती ओम नमः शिवाय बोलत आपल्या शरीरावर शेणाचा लेप लावत असेल, तर कोरोना विषाणूंपासून आपला जीव वाचवू शकतो. (हेही वाचा: Coronavirus: वुहान शहरातून एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातून 323 भारतीय दिल्लीमध्ये दाखल)

स्वामीजींची ही गोष्ट आता चर्चेचा विषय बनली आहे. हे खरे आहे की, शेण आणि गोमुत्र अनेक गोष्टींसाठी उपयुक्त आहेत, परंतु त्यामुळे खरोखरच हा विषाणू टाळता येऊ शकेल काय? असा प्रश्न लोक विचारात आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत चीनमध्ये 260 हून अधिक लोक मरण पावले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूची जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत स्वामी चक्रपाणी महाराजांच्या विधानाने लोक आश्चर्यचकित झाले आहेत.