
कर्नाटकातील मंगळुरूमध्ये 18 वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. असा आरोप आहे की एका बॉईज पेइंग गेस्टच्या मालकाने आणि त्याच्या चार साथीदारांनी विद्यार्थ्याला क्रूरपणे मारहाण केली. मुलाने पीजीसाठी गुगलवर 1 स्तर रेटिंग दिले होते. याच करणातून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आता त्याच्यावर हल्ला करून त्याला गुगलवर दिलेले 1 स्टार रेटिंग काढून टाकण्यास भाग पाडले. 17 मार्चच्या रात्री कादरी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली.
अहवालानुसार, कर्नाटकातील कलबुर्गी येथील रहिवासी असलेला पीडित विद्यार्थी विकास गेल्या सहा महिन्यांपासून या पीजीमध्ये राहत होता. अलिकडेच, तिथल्या निकृष्ट सुविधांना कंटाळून तो दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाला. विकासने गुगलवर पीजीला 1 स्टार रेटिंग दिले होते आणि त्याच्या रिव्ह्यूमध्ये खराब स्वच्छता, घाणेरडे शौचालये आणि अन्नातील कीटकांबद्दल तक्रार केली होती. (हेही वाचा: Gujarat Shocker: ऑनलाइन गेम आणि वाद, तीन अल्पवयीन मित्रांकडून 13 वर्षाच्या मुलाची हत्या; Free Fire Game ठरला जीवघेणा)
या रिव्ह्यूनंतर पीजी मालक संतोषने विकासला धमकी दिली आणि त्या टिप्पणी काढून टाकण्याची मागणी केली. विकासने नकार दिल्यावर संतोषसह अन्य चौघांनी त्याच्यावर हल्ला केला आणि रिव्ह्यू काढण्यास भाग पाडले. पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून पीजी मालक आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींवर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.