Karnataka Shocker: चौथीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची रॉडने बेदम मारहाण; शाळेच्या बाल्कनीतून खाली ढकलून दिले, मुलाचा मृत्यू
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

कर्नाटकातून (Karnataka) सोमवारी (19 डिसेंबर) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राज्यात उत्तर भागात आदर्श प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थ्याला आधी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आणि नंतर सरकारी शाळेच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीतून खाली ढकलून दिले. यामुळे चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. राज्याच्या उत्तरेकडील हदली गावातील आदर्श प्राथमिक शाळेत ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

या मुलाचे नाव भरत असून, तो इयत्ता चौथीचा विद्यार्थी होता. गडक जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवप्रकाश देवराजू यांनी पत्रकारांना सांगितले की, या मुलाच्या मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, ही कौटुंबिक घटना आहे. शिक्षक मुथप्पाने भरतची आई गीता बारकर यांनाही बेदम मारहाण केली, जी शाळेत शिक्षिका आहे. भरतच्या आईवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणारा हा कंत्राटी शिक्षक बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एन पाटील या अन्य शिक्षकालाही आरोपी शिक्षकाने मारहाण केली. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागील कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: कोल्डड्रिंक चोरल्याच्या रागात 10 वर्षांच्या मुलाला नग्न करून बेदम मारहाण; प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पावडर, दुकानदाराला अटक)

दरम्यान, गेल्या आठवड्यात दिल्लीतील एमसीडी शाळेतून अशीच एक घटना समोर आली होती. एमसीडी शाळेतील एका महिला शिक्षिकेने पाचवीच्या विद्यार्थिनीवर आधी कात्रीने हल्ला केला आणि नंतर त्याला पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. घटनेनंतर आरोपी शिक्षकाला 20 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. दिल्लीत 16 डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना समोर आली.

दिल्लीतील मॉडेल बस्तीजवळील दिल्ली एमसीडी शाळेच्या महिला शिक्षिकेने पाचवीच्या विद्यार्थ्याला पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. घटनेनंतर महिला शिक्षिकेला एमसीडीने निलंबित केले. ही घटना उघडकीस येताच सर्वांनाच धक्का बसला. साक्षीदारांच्या जबाबानंतर आरोपी शिक्षकेविरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.