वृद्धांची फसवणूक (Photo Credit : Pixabay)

आजकाल वृद्धांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच असे एक धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशमधील कानपूरमधून (Kanpur) समोर आले आहे. या ठिकाणी इस्रायली बनावटीच्या मशिनच्या साहाय्याने 65 वर्षीय वृद्धांना 25 वर्षीय तरुण बनवण्याच्या बहाण्याने 35 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपी राजीव कुमार आणि त्याची पत्नी रश्मी दुबे यांनी हा घोटाळा करण्यासाठी साकेत नगरमध्ये ‘रिव्हायव्हल वर्ड’ नावाची संस्था सुरू केली. पीडित रेणू सिंग चंदेलच्या म्हणण्यानुसार, या जोडप्याने लोकांना पटवून दिले की इस्रायली शास्त्रज्ञांनी 64 आणि त्याहून अधिक वयाच्या 35 वयोवृद्ध व्यक्तींना पाच दिवस एका चेंबरमध्ये शुद्ध ऑक्सिजन देऊन यशस्वीरित्या पुनरुज्जीवित केले आहे. त्यांनी दावा केला की, या प्रक्रियेमुळे तीन महिन्यांत ते 25 वर्षांचे झाले.

या जोडप्याने कथितरित्या दोन गुंतवणूक योजना सादर केल्या. एकाची किंमत 6,000 आणि दुसरी 90,000 रुपयांची होती. हा निधी इस्रायलकडून 25 कोटींमध्ये कायाकल्प मशीन खरेदी करण्यासाठी वापरला जाईल, असे सांगण्यात आले. यासह त्यांनी योजनेत इतरांची भरती करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन दिले. जे लोक 50 नवीन आयडी प्रदान करतील त्यांना गिफ्ट हॅम्पर्स देऊ केले.

रेणू सिंगने सांगितले की, तिने या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 150 आयडीसह 9 लाख रुपये आणि आणखी 3.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली. या जोडप्याने सुरुवातीला तिला एका वर्षात 3.5 लाख आणि 2.1 लाख परत करण्याचे वचन दिले होते, परंतु एका वर्षानंतर त्यांनी फक्त 1.75 लाख परत केले. उर्वरित रकमेबद्दल विचारले असता, या जोडप्याने तिला लवकरच प्लांट सुरू होईल व त्यानंतर पैसे परत करू असे आश्वासन दिले. (हेही वाचा: Mumbai Crime: रिल्सच्या माध्यमातून फसवणूक, तरुणाने गमावले 2.18 लाख, गुन्हा दाखल)

कालांतराने, हे स्पष्ट झाले की, या जोडप्याने असेच खोट्या बहाण्याने विविध व्यक्तींकडून सुमारे 35 कोटी रुपये उकळले होते. या घोटाळ्याचे प्रमाण लक्षात आल्यानंतर रेणू यांनी पोलीस आयुक्त अखिल कुमार यांच्याकडे तक्रार केली. किडवई नगर पोलिसांनी आता आयुक्तांच्या आदेशानुसार अहवाल नोंदवला असून तपास सुरू आहे. अनेक बळींची फसवणूक करून हे जोडपे परदेशात पळून जाण्याचा विचार करत असावेत असे अहवालात म्हटले आहे.